मागील साधारण दहा वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरण करण्याचे काम संथ गतीने सुरू आहे. हे काम अत्यंत कासवाच्या गतीने सुरू असल्याने महामार्गावरील वाहतुकीला प्रत्येक ऋतू मध्ये काही न काही अडथळे निर्माण होत आहेत. याच दरम्यान ऐन पावसाच्या तोंडावर अनेक ठिकाणी मातीचा भराव टाकल्याने पहिल्याच पावसाळ्यात संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे.
यामुळे महामार्गावर गाड्या घसरून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चिपळूण शिवाजीनगर परिसरात रस्त्यावर मंगळवारी दुपारी चार दुचाकी घसरल्या. त्यामध्ये तीन दुचाकी या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या होत्या.
कोकणात आता पाऊस सुरू होण्याआधीच अपघातच्या मालिका सुरु होण्याची संभावना जास्त असते, त्यात रस्त्याच्या कामासाठी मातीचे भराव टाकल्याने यामध्ये अधिकच भर पडत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करताना शहरात उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. तत्पूर्वी अंतर्गत सर्व्हिस रोड तयार केले जात आहेत. पण चिखलमय रस्त्यांवर वाहतूक करणे नागरिकांसाठी अवघड बनत चालले आहे.
ऐन पावसाळ्यात मातीचा भराव टाकून काम सुरू करण्यात आल्याने येथून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. जुना रोड आणि नवीन सर्व्हिस रोड जोडताना मातीचा भराव टाकण्यात आला आहे. सोमवारपासून शहरामध्ये काही प्रमाणात पावसाला सुरवात झाली आहे. त्यामुळे रस्त्यासाठी टाकलेली भरावाची माती दोन्ही बाजूने सुमारे अडीज कि.मी. पर्यंत वाहून सुमारे अडीच कि. मी. पूर्णच्या पूर्ण रस्ता चिखलाने माखला आहे. जेवढी वाहने त्यावरुन जात आहेत, तेवढीच माती अजून सर्वत्र पसरत आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग चिखलमय झाला असल्याने पावसाळ्यात वाहन चालवताना अनेक अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत.