उपमुख्यमंत्री अजित पवार साताऱ्यातील पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले कि, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढायला लागल्यास मुख्यमंत्र्यांना त्या संदर्भात कठोर निर्णय घ्यावा लागेल. त्या वेळी ठरेल त्याप्रमाणे राज्यभर त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, असे राज्यस्तरावर याबाबत विचारविनिमय सुरू झाला आहे.
मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ स्तरावर निर्णय होतील त्याप्रमाणे त्या त्या भागात त्याची अंमलबजावणी करावी लागेल. राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा मोठ्या शहरामध्ये कोरोनाच्या सक्रीय रुग्णामध्ये मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नंतर शिक्षण विभागाने मुंबई वगळता इतर जिल्ह्यातील शाळा सुरु राहणार असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे.
राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत राज्यातील शाळा आणि लसीकरणा बाबतचा आढावा घेतला. या बैठकीमध्ये सध्याच्या कोरोना स्थितीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मुंबई आणि परिसर वगळता राज्यातील इतर भागामध्ये कोरोना सक्रीय रुग्णांची संख्या कमी प्रमाणात आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शाळा बंद न करता, जिथे प्रमाण जास्त आहे तिथल्याच फक्त शाळा बंद करण्यात आल्या आहेत. उर्वरित विभागातील शाळांनी कोरोना नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत.
परंतु, मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णवाढ हा विषय काळजीत टाकणारा ठरला आहे. रुग्णवाढ असताना मुलांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सांगितलं जात आहे. पहिली ते आठवीच्या शाळा नुकत्याच सुरु झाल्या होत्या. मात्र पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका व सुरक्षितता लक्षात घेता महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी शाळांबाबत अखेर निर्णय घेतला आहे. ऑफलाईन पद्धतीने शाळा बंद ठेवण्यात येत असल्या तरी, पूर्वीसारख्या ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरु राहणार आहेत.