शहरातील शंकरवाडी-मुरादपूर वाशिष्ठी नदी तिरावरील नलावडा बंधारा वाहून गेल्याने या परिसरात पूरस्थिती निर्माण होते. यामुळे नलावडा बंधारा येथे पूर संरक्षक भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली होती. याची दखल घेऊन आमदार शेखर निकम यांनी पाठपुरावा केल्यामुळे नलावडा बंधारा येथे पूर संरक्षक भिंतीसाठी २० कोटी २१ लाख १९ हजार ३०० रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे शंकरवाडी- मुरादपूर परिसर पूरमुक्त होण्यास मदत होणार आहे. चिपळूण शहरामध्ये वाशिष्ठी नदीच्या काठावर शंकरवाडी-मुरादपूर या दोन वाड्यांमध्ये कमी उंचीचा सखल भाग आहे. या ठिकाणी वाशिष्ठी नदीच्या पात्रास वळण तयार झाले आहे.
नदीच्या वळणाच्या आतील बाजूस गाळ व वाळू साठलेली असून वळणाची बाहेरील बाजू दरवर्षी पुराच्या पाण्याने खचत आहे. या नदीच्या वळणावर संरक्षक भिंतीचे (नलावडा बंधारा) जुने दगडी बांधकाम पूर्वी केले होते; परंतु पुरामुळे बंधाऱ्याचे बांधकाम वाहून गेले आहे. त्यामुळे शंकरवाडी, गोसावीवाडी व भोईवाडी या आजुबाजूच्या परिसरात पुराचे पाणी शिरून वित्तहानी झाली आहे. नदीपात्रामध्ये या ठिकाणी वळण असल्याने अतिवृष्टी कालावधीमध्ये पुराचे येणारे पाणी नदीच्या वळणाप्रमाणे नदीपात्रात न जाता वेगाने थेट शंकरवाडी, गोसावीवाडी यामधील कमी उंचीच्या सखल भागात जात आहे.
पुरामुळे नदीच्या पाण्याला वेग असल्याने व त्या वळण्याच्या बाहेरील बाजूची संरक्षक भिंत पुराने वाहून गेल्याने माती खचत आहे. भिंतीचे बांधकाम केल्यास नदीच्या पुराचे पाणी गोसावीवाडीच्या विरुद्ध दिशेला नदीच्या काठावर सपाट जमीन असल्याने त्या भागात पसरण्यास मदत होईल व त्या बाजूकडील भागामध्ये लोकवस्ती व घरे (वालोपे व कळंबस्ते गावाचा भाग) नसल्यामुळे त्या ठिकाणी नुक्सानीचा धोका नाही. शंकरवाडी येथून वाशिष्ठी नदीचे पाणी चिपळूण शहरामध्ये सांस्कृतिक केंद्र, स्मशानशेड, वाणी आळीमागें शिवनदीला मिळते. हे पाणी शंकरवाडी येथे अडवल्यास शंकरवाडी, गोसावीवाडी, भोईवाडी या तिन्ही वाडीतील घरांना धोका पोहचणार नाही तसेच वाशिष्ठी नदीचे पाणी आजुबाजूला पसरल्याने शहरातील जी पाण्याची पातळी वाढते त्यास अटकाव होईल.