तुम्ही सुवेर, सुतक पाळत नाही आणि देवीचे दास्तानसुद्धा देत नाही, तुमचे खानदान संपवून टाकतो, असे म्हणत दोन महाविद्यालयीन तरुणींना दांडक्याने केलेल्या बेदम मारहाणीत एक तरुणी ठार झाली होती. या प्रकरणी गुन्हा सिद्ध झाल्यामुळे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिलकुमार आंबाळकर यांनी आरोपीला जन्मठेप आणि १५ हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. भालवली (ता. राजापूर) येथील धारतळे येथे २०२३ मध्ये ही घटना घडली होती. विनायक शंकर गुरव (वय ५५, रा. भालवली, वरची गुरववाडी, ता. राजापूर) असे जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना १८ जानेवारी २०२३ ला सकाळी पावणेअकराच्या सुमारास भालवली-धारतळे कॉलेज येथील कमलावलीफाटा ते वरची गुरववाडी रस्त्यावर घडली होती. विनायक गुरव, महाविद्यालयीन तरुणी साक्षी मुकुंद गुरव (वय १९, रा. वरची गुरववाडी-भालवली) व संजय गुरव (वय २१) हे एकाच वाडीत राहणारे आहेत. सुवेर व सुतक पाळण्यावरून व देवाचे दास्तान घेण्यावरून दोन गटांमध्ये वाद झाले होते.
आरोपी विनायक यांच्या जुन्या घरासाठी घरकुल योजना मंजूर झालेली आहे; परंतु आरोपी याचे जुने घर हे विरोधी गटातील व्यक्तीच्या जागेत आल्याने घरकुल योजनेअंतर्गत बांधकामाला विरोधी गटाने स्थगिती आणलेली आहे. या प्रकरणामध्ये साक्षी व सिद्धी हिचे कुटुंबीय सामील असल्याचा राग विनायक गुरव यांच्या मनात होता. त्या रागातून १८ जानेवारीला विनायक गुरव महाविद्यालयाच्या रस्त्यावर दबा धरून होता. साक्षी व सिद्धी तिथे आल्यानंतर, ‘तुम्ही सुवेर सुतक पाळत नाही आणि देवीचे दास्तानसुद्धा देत नाही, तुमचे खानदान संपवून टाकतो’, असे बोलून हातातील लाकडी दांडक्याने साक्षी गुरव हिच्यावर डोक्याच्या मागील बाजूस वर्मी प्रहार केला. यात तिला गंभीर दुखापत झाली. त्यामध्ये तिचा मृत्यू झाला. तिच्या सोबत असलेली सिद्धी गुरवही गंभीर जखमी झाली.
संशयित विनायक गुरवने तेथून पळून जाऊन लाकडी दांडा लपवून ठेवला. या प्रकरणी नाटे सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आबासाहेब पाटील करत होते. तपासात पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याचा निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिलकुमार आंबाळकर यांच्या न्यायालयात आज झाला. जिल्हा अभियोक्ता अॅड. अनिरुद्ध फणसेकर यांनी या खटल्याचे काम पाहताना १४ साक्षीदार तपासले.

