जाहीर झाल्यापासून सतत चर्चेत असलेल्या ‘मुख्यमंत्री म ाझी लाडकी बहिण’ योजनेतून रत्नागिरी जिल्हयातील ४७ हजार लाभार्थीची नावे छाननीनंतर कमी करण्यात आली आहेत. हा जिल्हयातील लाडक्या बहिणीसाठी एक मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. दरम्यान या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचा हफ्ता देखील अजूनही मिळालेला नाही. निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने लाडकी बहिण योजना जाहीर केली. त्याचा फायदा महायुतीला मिळाला. महिलांच्या बंपर व्होटिंगमुळे महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आले. मात्र सत्तेवर येताच या लाडक्या बहिण योजनेच्या लाभार्थ्यांची फेरपडताळणी किंवा छाननी करण्यात आली. निवडणुकीच्या तोंडावर ही योजना जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे ज्यांनी अर्ज केले त्याची कोणतीही पडताळणी न करता त्यांना लाभ देण्यास सुरूवात झाली. पुन्हा सत्ता मिळताच या लाडक्या बहिण योजनेचा मोठा ताण सरकारच्या तिजोरीवर पडत असल्याने लाभार्थीच्या अर्जाची फेरपडताळणी सुरू करण्यात आली.
ज्यांच्या अर्जामध्ये त्रुटी आढळल्या, ज्या प्रत्यक्षात अपात्र ठरतात परंतु लाभ घेत आहेत अशा बहिणींची नावे वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. काही जिल्हयांमध्ये तर चक्क पुरूषांनीच या योजनेचा लाभ घेतल्याचे पुढे आले. त्यांच्याकडून आता दिलेल्या पैशाची वसुली करण्यात येणार असून फसवणुकीबद्दल रितसर कारवाई देखील करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्हयाचा विचार करता तब्बल ४७ हजार नावे कमी झाली आहेत. त्यांनी या योजनेचा चुकीची माहिती देवून गैरफायदा घेतल्याचे पुढे आले आहे. ज्यांच्याकडे चार चाकी गाडी आहे, सरकारी नोकरी आहे, किंवा वयोमर्यादा ओलांडली आहे, आयकर भरला आहे अशा बहिणींची नावे आता यादीतून वगळण्यात आली आहेत. या योजनेसाठी रत्नागिरी जिल्हयातून जवळपास ४ लाख २० हजार ४४० लाभार्थ्यांनी अर्ज केले होते.
चौकशी आणि छाननीनंतर त्यातील ४६ हजार ९६३ लाभार्थी निकषात बसत नसल्याने कमी करण्यात आले. आहेत. दरम्यान ५३ बहिणींनी छाननीनंतर स्वतःहून या योजनेचा लाभ आपल्याला नको असे कळविले आहे. आता केवायसी (ओळखपत्र आदी) अनिवार्य करण्यात आल्याने आणखी काही नावे कट होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत जिल्हयात या योजनेच्या ३ लाख ७७ हजार ४७७ महिला लाभार्थी आहेत. त्यामध्ये साधारणपणे चिपळूणात ६१ हजार ५९२, दापोलीमध्ये ४३ हजार ६१८, गुहागरमध्ये ३२ हजार २३३, खेडमध्ये ४० हजार ६८२, लांज्यात २५ हजार ८४, मंडणगडमध्ये १५ हजार ४५३, राजापूरमध्ये ३९ हजार ९३५, रत्नागिरीमध्ये ७१ हजार ४५४, संगमेश्वरमध्ये ४७ हजार ४२६ लाभार्थी आहेत.

