30.1 C
Ratnagiri
Friday, February 20, 2026

पानवल धरणाची दुरुस्ती अंतिम टप्प्यात रत्नागिरीकरांना दिलासा

रत्नागिरी शहराची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या आणि नगरपालिकेच्या...

कशेळी पर्यटकांच्या पसंतीस; पण सुविधांची वानवा

समुद्राची गाज आणि वैशिष्ट्यपूर्ण सूर्यमंदिर यामुळे कशेळी...

बावनदी पूल वाहतुकीस खुला एका मार्गिकेवरून प्रवास

मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी पुलाचे काम पूर्ण होत...
HomeRatnagiriशिक्षकांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी नाटे शाळेच्या गेटवर ठिय्या आंदोलन

शिक्षकांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी नाटे शाळेच्या गेटवर ठिय्या आंदोलन

या आंदोलनामुळे काही काळ विद्यार्थ्यांना शाळेच्या गेटबाहेरच थांबवण्यात आले.

शालेय पोषण आहार प्रकरणातील दोन शिक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी बुधवारी सकाळी ९ वाजल्यापासून शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी शाळेच्या गेटवर फलक लावत शिक्षक, विद्यार्थी व पालकांना शाळेत प्रवेश देऊ नये, अशी भूमिका घेतल्याने शाळेच्या परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. समजुत काढण्यासाठी लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय अधिकारीही आले मात्र त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. या घटनेची माहिती शाळेचे मुख्याध्यापक यांनी तात्काळ सागरी पोलीस ठाणे, नाटे यांना दिली. दरम्यानच्या काळात आंदोलनस्थळी ग्रामस्थ, पालक आणि आंदोलनकर्त्यांची मोठी गर्दी जमली, रमेश लांजेकर, मनोज आडवीरकर, मकरंद धाकरस, नरेश साखरकर यांच्यासह आंदोलनकर्त्यांनी संबंधित दोन शिक्षकांना शाळेत प्रवेश देणार नाही आणि त्यांचे निलंबन झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका जाहीरपणे मांडली.

पोलिसांचा हस्तक्षेप – या आंदोलनामुळे काही काळ विद्यार्थ्यांना शाळेच्या गेटबाहेरच थांबवण्यात आले. काही पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत जाऊ द्यावे, अशी मागणी केली, तेरे काही सुज्ञ आंदोलनकर्त्यांनीही विद्यार्थ्यांच्या हितासाठी ही भूमिका मान्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र याला विरोध झाल्याने शाळेच्या गेटसमोर मोठ्या प्रमाणावर बाचाबाची झाली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

तीव्र विरोध – याच दरम्यान सामाजिक कार्यकर्ते आणि मच्छीमार नेते अमजद बोरकर तसेच मलिक गडकरी यांनी आंदोलनकर्त्यांना संबोधित करत, अशा प्रकारे आंदोलन करू नका, शिक्षकांना अडवू नका. यामुळे मुलांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे, असे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या या भूमिकेलाही तीव्र विरोध करण्यात आला आणि त्यांच्यासोबतही मोठ्या प्रमाणावर बाचाबाची झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. शाळेबाहेर तणाव शाळेबाहेर तणाव कायम होता. जवळपास एक ते दीड तास शाळेसमोरून सागरी महामार्ग जात असल्याने वाहतुकीला अडथळा होऊ नये तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस सातत्याने आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत होते. दरम्यान राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.

अधिकारीही पोहोचले – याच दरम्यान राजापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले आणि त्यांचे सहकारीही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आंदोलनकर्त्यांसमोर शिक्षण विभाग आणि प्रशासनाकडून आतापर्यंत या प्रकरणात करण्यात आलेल्या सर्व कारवाईची सविस्तर माहिती दिली. तसेच ही शाळा संस्था चालवत असल्याने त्यासंदर्भातील निर्णय घेण्याचे अधिकार संस्थेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी संस्था अध्यक्ष तथा सरपंच यांच्याशीही यासंदर्भात चर्चा केल्याचे सांगितले.

सरपंच आले पण.. – मात्र या चर्चामधूनही कोणताही ठोस तोडगा निघू शकला नाही. आंदोलनकर्त्यांनी, सरपंचांनी ग्रामस्थांसमोर प्रत्यक्ष येऊन आपली भूमिका मांडावी, अशी वारंवार मागणी लावून धरली. पोलिसांनीही मध्यस्थी करत सरपंचांनी आपली भूमिका आंदोलनकर्त्यांसमोर मांडावी, असे सांगितले. यानंतर सरपंच संदीप बांदकर यांनी दोन ते तीन वेळा ग्रामस्थ आणि आंदोलनकर्त्यांसमोर येऊन, शाळा संमिती आणि संस्थेची पुन्हा एकदा बैठक घेऊन या विषयावर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी कोणीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचे चित्र होते आणि तणाव अधिकच वाढताना दिसत होता. आमची बाजू जाणून घेतली नाही दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र जाधव यांनी सांगितले की, पोषण आहार चोरीचा आरोप झाल्यानंतर आमच्यावर तात्काळ गुन्हे नोंदविण्यात आले. हे असे का घडले, याची कोणतीही चौकशी किंवा आमची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला नाही. गेल्या जवळपास ३५ वर्षांपासून आम्ही या शाळेत ज्ञानदानाचे कार्य प्रामाणिकपणे करत आहोत; मात्र आजपर्यंत कोणीही आमची बाजू ऐकून घेण्याचा प्रयत्न केलेला नाही, असे त्यांनी नमूद केले. सध्या प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने आपली बाजू न्यायालयातच मांडावी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतरही चुकीच्या पद्धतीने संबोधले जात असल्याचा आणि दबावतंत्राचा वापर होत असल्याचा आरोप करत, आपण आणि आपले कुटुंबीय प्रचंड मानसिक तणावाखाली असल्याचे त्यांनी नमूद केले.

तक्रार नाही – शाळेबाहेर झालेल्या या आंदोलनासंदर्भात दुपारपर्यंत कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नव्हती. आता संबंधित शिक्षकांकडून किंवा संस्थेकडून तक्रार दाखल केली जाते का, आणि त्यानंतर पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोषण आहार प्रकरणाचे कोणीही समर्थन करत नसले, तरी हा विषय कायदेशीर प्रक्रियेत असताना शाळेच्या गेटवर आंदोलन करून वातावरण तणावपूर्ण करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या वादाचा परिणाम शाळेच्या शैक्षणिक वातावरणावर होऊ नये आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येऊ नये, अशी अपेक्षा पालक आणि नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular