आज २६ सप्टेंबर २०२२ पासून शारदीय नवरात्रीला प्रारंभ झाला असून ५ ऑक्टोबर २०२२ रोजी दशमी तिथी म्हणजेच दसऱ्याला ती संपणार आहे. शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांच्या आरोग्या संदर्भात एक घोषणा केली आहे. राज्यातील सर्व माता,भगिनींनी आपल्या आरोग्याची अवश्य तपासणी करून घ्यावी अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं महिलांसाठी एक खास अभियान राबवण्यात येणार आहे.
आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने राज्याच्या आरोग्य विभागामार्फत “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” हे विशेष अभियान राबवलं जाणार आहे. २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान चालणाऱ्या या अभियानात घरातील माता निरोगी राहावी, जागरूक राहावी आणि समाजात तिच्या आरोग्याबद्दल संवेदनशीलता निर्माण व्हावी असा आमचा उद्देश आहे. सदर अभियान राबविण्यासाठी सर्व संबंधित विभागांचा सहभाग घेणे, नियोजन करणे यासाठी सभा जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
महिलांची आरोग्य तपासणी, उपचारात्मक आरोग्य सुविधा, प्रतिबंधात्मक औषधे, लसी उपलब्ध करून देणे, सुरक्षित, सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदरचे अभियान राबविले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी दिली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाकडूनं राज्यभरात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान राबवलं जाणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी ९ ते २ या वेळेमध्ये १८ वर्षावरील महिला, माता यांच्या सर्वांगीण तपासण्या केल्या जाणार आहेत. यामध्ये रक्त तपासण्या, जननी सुरक्षा योजना प्रधानमंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांचं नवीन बँक खातं उघडणं, गरोदर मातांचं आधारकार्ड जोडणं यांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.