रत्नागिरी तालुक्यातील गोळप-मुस्लिमवाडी येथे आंबा बागेतील दोन सख्ख्या भावांच्या खूनप्रकरणी २० हून अधिक गुरख्यांची कसून चौकशी केल्यानंतर गोळपमधीलच एका बागेतील गुरख्याला पोलिसांनी अटक केली. त्याने खुनाची कबुली दिली आहे. सरण कुमार ऊर्फ गोपाळ शशिराम विश्वकर्मा (वय ५८, मूळ रा. टिकापूर, नेपाळ) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. मंगळवारी खुनाची घटना समोर आल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील गुरख्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तपासात पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले होते.
गुरुवारी (ता. २) रात्री याप्रकरणी गोळप येथील बागेत रखवालदारी करणाऱ्या सरणकुमारला पोलिसांनी अटक केली. २९ एप्रिलला भक्त बहादूर थापा (वय ७२) आणि खडक बहादूर थापा (६५, रा. मूळ नेपाळ, सध्या रा. आंबा बाग, गोळप) हे दोघे भाऊ आणि संशयित सरण कुमार ऊर्फ गोपाळ शशिराम विश्वकर्मा हे तिघे दारू पिण्यासाठी एकत्र गेले होते. त्यानंतर तिघेही मुकादम यांच्या बागेमध्ये मुक्कामाच्या ठिकाणी आले. तिथे पुन्हा तिघांनी दारू प्यायली. नशा चढल्यानंतर गोपाळ विश्वकर्मा याने खडकबहादूर थापा याला शिवीगाळ केली. त्यामुळे खडकबहादूरने विश्वकर्मा याच्या अंगावर धावून जात हल्ला केला व त्याला मारहाण केली.
त्यावेळी भक्त बहादूर थापा भावाच्या मदतीला धावला. खडकबहादूरला मारहाण करून त्याची मान आवळल्यामुळे तो खाली पडला. त्यानंतर गोपाळने भक्त बहादूर थापाला हाताने पकडून खाली पाडले. त्यात डोक्याला मार लागल्यामुळे तो निपचित पडला. त्यानंतर गोपाळ विश्वकर्मा याने जवळ असलेले दगड घेऊन दोघांच्याही छातीवर मारले आणि कोयत्याने चेहऱ्यावर व अंगावर वार केले. त्यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला. ही घटना रात्री अकराच्या सुमारास घडली होती. त्यानंतर संशयित गोपाळ विश्वकर्मा पाटील यांच्या बागेमध्ये राखणीला निघून गेला.
बागेचा परिसर मोठा असल्याने त्याठिकाणी गुरख्यांची संख्या देखील जास्त आहे. अशा स्थितीत या दोन भावांचे कुणाशी भांडण झाले होते, अशा पद्धतीने तपास सुरू होता. यातूनच सुमारे २० गुरख्यांची चौकशी केली. एका तरुणावर पोलिसांचा संशय होता. पोलिसांनी चौकशी केली असता संशयित गोपाळ शशिराम विश्वकर्मा याने अखेर गुन्ह्याची कबुली दिली आणि घडलेला घटनाक्रम पोलिसांसमोर कथन केला. त्याला पोलिसांनी अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.