निवडणूक विभागाने नवमतदारांची नोंद मोहीम सुरू केली आहे; मात्र राज्यात आणि केंद्रात घडत असलेल्या अतिशय खालच्या पातळीवरील राजकारणामुळे नवीन युवकांना पुढे या, मतदार व्हा, मतदान करा, असे आवाहन कसे करावे, हा प्रश्नही यंत्रणा राबवणाऱ्या कर्मचाऱ्यांना पडला आहे. आता मतदान करण्यात रस नाही, असे उत्तर नवं मतदारांकडून येत असल्यामुळे ही मोहीम राबवणे हेच आव्हान यंत्रणेसमोर आहे. प्रशासनाने नवमतदार नोंदणीची मोहीम उघडली. मतदार नोंदणी कार्यक्रमाची जूनपासून सुरवात झाली आहे.
पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण नोंदणी झाली आहे. आता मतदार नोंदणी अधिकारी (बीएलओ) घरीघरी जाऊन नोंदणी करत आहेत. २१ ऑगस्टपर्यंत हा कार्यक्रम चालेल. त्यानंतर त्रुटी दूर करण्याची प्रक्रिया सुरू होईल ती २९ सप्टेंबरपर्यंत असेल. १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित पुरवणी व एकत्रित यादी १६ ऑक्टोबरपर्यंत निश्चित केली जाईल. त्यानंतर दावे व हरकती स्वीकारल्या जातील. ५ जानेवारीला अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. नवीन मतदार नोंदणी, मतदान ओळखपत्रात आधार जोडणी, नाव कमी करण्यासाठी अर्ज करणे आदी कार्यवाही या काळात होईल.
चिपळूण तालुक्यात गुहागर मतदार संघासाठी ९२ कर्मचारी आणि चिपळूण मतदार संघासाठी १७० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे शिक्षक, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आणि पालिका कर्मचारी नवमतदारांची नोंदणी करत आहेत. या कर्मचाऱ्यांना अनेक ठिकाणी नकारात्मक उत्तर मिळत आहे, असे कर्मचारी खासगीत सांगत आहेत. नावात दुरुस्तीसाठी शंभरजणांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. तर नवीन नावनोंदणीसाठी केवळ ४० जणांचे अर्ज आले आहेत.