मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास म्हणजे कसरतच बनू लागला आहे. खड्ड्यांमुळे महामार्गाची झालेली दूरवस्था, घाट रस्त्यामुळे या मार्गावर प्रवासात नेहमीच आव्हाने असतात. नुकताच घाटातील रस्त्यावर संरक्षक भिंत खचल्यामुळे रात्रीचा प्रवास धोकादायक बनला आहे. पावसाळ्यात मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास अधिक खडतर होऊन जातो. रात्री या मार्गावरून प्रवास करणे सुरक्षित नाही, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. मुंबई – गोवा महामार्ग रात्रीच्या प्रवासात प्रवाशांना लुटण्याचा किंवा त्यांच्या वाहनांवर दरोडा टाकण्याचा प्रकार होत नाहीत. त्यादृष्टीने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग १०० टक्के सुरक्षित आहे. आडमार्गावरही काळजी घेण्याची गरज वाटत नाही. मात्र, रात्री सुनसान ठिकाणी किंवा अगदीच निर्मनुष्य ठिकाणी न थांबण्याची सूचना केली जाते. गेल्या १५ वर्षांहून अधिक काळापासून मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू आहे.
दुरवस्थेमुळे या महामार्गावर अनेकांचे बळी गेले आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून देखील महामार्गाचे काम पूर्ण न झाल्याने प्रवासी संताप व्यक्त करीत आहेत. यामुळे या महामार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. ज्या ठिकाणी काम पूर्ण झाले आहे तेथील कामाचा दर्जा निकृष्ट आहे. त्यामुळे कुठे दरडी कोसळतात, कुठे सिमेंटचा रस्ता खचतो, तर कुठे मातीचा भराव आणि संरक्षण भिंती कोसळत असल्याचे प्रकार सुरू आहेत. परशुराम घाटात दरडी कोसळतात, रस्ता खचणे, मातीचा भराव वाहून जाणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. कामथे घाटातील सिमेंटच्या रस्त्याला तडे गेले. सावर्डेनजीक उड्डाण पुलावरील मातीचा रस्ता खचला. या घटना दिवसा घडल्यान कोणतीही मोठी हानी झाली नाही. याच घटना जर रात्रीच्या वेळी घडल्या तर त्यातून वाचण्याचे मोठे आव्हान प्रवाशांसमोर आणि वाहन चालकांसमोर आहे.