विधानसभा निवडणुकीत काठावर पास झालेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पालिका निवडणुकीत यशाची घोडदौड कायम राखता आली नाही. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना, भाजप युतीने राष्ट्रवादीसाठी दारे बंद केली आहे. त्यामुळे आगामी काळात महायुतीचा वारू रोखण्याबरोबरच स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला निकराची लढाई लढावी लागणार आहे. चिपळूण पालिकेच्या निवडणुकीचे धक्कादायक निकाल लागले. आमदार शेखर निकम यांनी शहरविकासासाठी कोट्यवधी रुपयाचा विकासनिधी आणला; मात्र त्यांच्या पक्षाला केवळ दोनच जागा मिळाल्या. काँग्रेस पक्षाचे शहरात फारसे अस्तित्व नाही. काँग्रेसच्या तालुकाध्यक्षाने निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची साथ सोडली, तरीही या पक्षाला तीन म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा एक जागा जास्त मिळाली. यावरून आमदार शेखर निकम यांना विचार करायला लावणारा निकाल लागला.
पालिका निवडणुकीत महायुती होईल, असे पालकमंत्री उदय सामंत सुरुवातीपासून सांगत होते. आमदार निकम यांच्याकडे त्यांनी जागावाटपाबाबत चर्चा केली तेव्हा निकम यांनी दहा जागांची मागणी केली होती. त्यानंतर हक्काच्या पाच जागा कोणत्या? अशी विचारणा पालकमंत्र्यांनी केल्यानंतर त्या जागाही आमदार निकम यांनी पालकमंत्र्यांना कळवल्या; मात्र प्रभाग क्र. ९ मध्ये पक्षाच्या शहराध्यक्षा आदिती देशपांडे आणि प्रभाग ११ मध्ये किशोर रेडीज यांना उमेदवारी मिळावी, म्हणून निकम ठाम होते. या दोन जागांसह निकम सात जागांवर ठाम होते; मात्र शिवसेनेने दोन्ही जागा देण्यास विरोध केल्यामुळे अखेरच्या क्षणी महायुती तुटली तरीही आमदार निकम यांनी पंधरा जागांवर आपले उमेदवार उभे केले होते.
पालिका निवडणुकीत चांगले यश प्राप्त झाल्यानंतर शिवसेना, भाजप युतीचा आत्मविश्वास वाढला आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीसाठी महायुतीची दारे बंद झाल्याची घोषणा पालकमंत्री सामंत यांनी केली. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या भाजपने तालुक्यात चांगले बळ तयार केले आहे. या पक्षाला काही जागा सोडाव्या लागणार आहेत. राष्ट्रवादीला महायुतीमध्ये मिळाली असती, तर जागा शिवसेनेला आपल्या हक्काच्या जागा राष्ट्रवादीसाठी सोडाव्या लागल्या असत्या. त्यामुळे पालिका निवडणुकीतील यशानंतर पालकमंत्र्यांनी युतीची घोषणा केली आहे. माजी आमदार सदानंद चव्हाण आणि भाजप नेते प्रशांत यादव जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या बांधणीसाठी उतरले आहेत. काही दिवसांपूर्वी सदानंद चव्हाण यांनी बैठक घेऊन जिल्हा परिषद गटांचा का आढावा घेतला होता. आता पक्षाच्या वरिष्ठांकडून महायुतीऐवजी युतीचे स्पष्ट संकेत मिळाल्याने राष्ट्रवादीला निकराची लढाई लढावी लागणार आहे.
राष्ट्रवादीला आत्मचिंतन करावे लागणार – मतदार संघाच्या विकासासाठी आमदार शेखर निकम यांनी पाण्यासारखा पैसा आणूनसुद्धा त्यांना मतदारांची साथ मिळाली नाही. दुसरीकडे विकासकामांचे आश्वासन देऊनच शिवसेनेने यश मिळवले. त्यामुळे आपले नक्की कुठे चुकत आहे? निवडणुकीसाठी निवडलेले उमेदवार चुकीचे होते की, ज्या कार्यकर्त्यांना आपण बळ दिले तेच निवडणुकीत कमी पडले, याचे आत्मचिंतन आमदार निकम यांना करावे लागणार आहे.

