रत्नागिरीमध्ये ११ आणि १२ जून रोजी अतिवृष्टीचा इशारा दिल्याने, दोन दिवस कर्फ्यू जारी करण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्तीचा धोका ओळखून पूर्वनियोजन सुद्धा करण्यात आले आहे. परंतु, ११ जून सकाळपासून कडक उन्ह पडले होते, साधारण दुपारपासून पावसाला सुरुवात झाली. मागील वर्षापासून अनेक नैसर्गिक आपत्ती आल्याने जिल्हा प्रशासन यंत्रणेने आधीपासूनच जनतेला सतर्क केले आहे.
जिल्ह्यात मागील चोवीस तासामध्ये काही तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पावसाची नोंद करण्यात आली आहे. रत्नागिरी ८.३०, लांजा १३.१०, राजापूर १४.६०, संगमेश्वर ३.१०, चिपळूण ५.१० मिमी, खेड ३९.९०, मंडणगड १८.३०, दापोली ६.८०, गुहागर १०.१० मिमी एवढी नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत साधारण २१५ मिमी सरासरी नोंद झाली आहे.
या दोन दिवसामध्ये अतिवृष्टी झाली नसली तरी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये १४ जून पर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. अमावास्येच्या भरतीमुळे किनारपट्टी भागामध्ये पाऊस आणि वेगाच्या वार्यामुळे लाटांची उंची वाढलेली. त्यामुळे किनारपट्टीच्या जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. परंतू, पावसाचा वेग ओसरल्याने नागरिकांनी नि:श्वास सोडला.
रत्नागिरी आणि चिपळूण व्यतिरिक्त इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी दिसून आले. काही ठिकाणी एखादी पावसाची सर येऊन गेल्यानंतर ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी पावसाळी वातावरणाची चांगलीच उघडीप झाली होती, सूर्याची सोनेरी किरणे सर्वत्र पसरली होतीत. मंडणगड मध्ये पडलेल्या पावसामुळे निवळी आणि भारजा नद्या ओसांडून वाहत होत्या, पण त्यांची पाण्याची धोकादायक पातळी वाढली नव्हती. परंतु, किनाऱ्यालगतच्या लोकांनी अतिवृष्टीच्या इशार्याने रात्र जागून काढली. अतिवृष्टीचा इशारा दिला असला तरी, १० जून रात्रीपर्यंत कर्फ्युचा आदेश निघाला नसल्याने जनता संभ्रमित होती, पण नाम. उदय सामंत यांनी रत्नागिरीमध्ये कर्फ्यू नाही असे स्पष्ट केले आहे. फक्त ब्रेक द चेन अंतर्गत वीकेंड लॉकडाऊन असणार आहे.