स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २० किंवा त्यापेक्षा कमी पट असलेल्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षक किंवा डीएड्, बीएड्द्धारकांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे; मात्र यामध्ये सामाजिक आरक्षण व समांतर आरक्षणाची तरतूद न करता घटनात्मक सामाजिक न्यायाचा भंग करणाऱ्या शासनविरोधी निर्णयाचा व आरक्षणविरोधी धोरणाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (ए) मंडणगड शाखेने जाहीर निषेध केला आहे. याबाबत तहसीलदार अक्षय ढाकणे यांची पार्टीचे माजी अध्यक्ष राजेश गमरे, अध्यक्ष राजेश साळवी, सरचिटणीस अनिल साखरे, राजेश खैरे, जयवंत जाधव, अनंत जाधव, मनोहर जाधव आदींनी भेट घेऊन निवेदन दिले.
वीस किव्हा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये शिक्षकांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्यासाठी काढण्यात आलेल्या आदेशात सामाजिक आरक्षण व समांतर आरक्षणाची कोणतीही तरतूद केलेली नाही. त्यामुळे आरक्षण असलेल्या वर्गातील उमेदवारांवर अन्याय होणार आहे. घटनात्मक सामाजिक न्यायाचा भंग करणाऱ्या सरकारच्या निर्णयाचा व आरक्षणविरोधी धोरणाचा निषेध करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
बहुतांश शाळांमध्ये शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, याबाबत वरवरची मलमपट्टी करण्यापेक्षा कायमस्वरूपी तोडगा काढत शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे. भरती प्रक्रिया तातडीने राबवण्यासाठी निर्णय घ्यावा. सध्याच्या भरती प्रक्रियेत बिंदू नामावली म्हणजेच रोस्टरची तरतूद करण्यात यावी. तसे न केल्यास पक्षाच्यावतीने राज्यभर जनआंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.