रत्नागिरी शहर व तालुक्यातील खासगी सावकारीची पाळेमुळे खणून काढण्याची पोलिसांनी सुरुवात केल्यानंतर तक्रारींचा ओघ सुरू आहे. शहरात सावकारी कर्जाविरुद्ध पाच तक्रारी पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर काल आणखी एका सावकाराविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ३८ हजार कर्ज घेतलेले असताना २ लाख उसने घेतले अशी जबरदस्तीने नोटरी करून फसवणूक केली. तसेच ठार मारण्याची धमकी सावकाराने दिल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधवारी (ता. ३) पावणेदोनच्या सुमारास शहर पोलिस ठाण्यात परवाना नसताना २ लाखांची जबरदस्तीने नोटरी करून फसवणूक करून मुलगा व वडिलांना ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना पुढे आली आहे.
ही घटना मार्च २०२३ ते २ जानेवारी २०२४ या कालावधीत तालुक्यातील करबुडे येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सुजन सुरेश सागवेकर यांनी संशयित सर्वेश विजय पाटील (मिरजोळे-पाटील वाडी, रत्नागिरी) याच्याकडून मार्च २०२३ ला दुपारी सागवेकर यांची आई सुप्रिया यांच्या उपचारासाठी दुचाकी गहाण ठेवून ३८ हजार रुपये दहा टक्के महिना व्याजाने घेतले होते. त्याबदल्यात संशयित सर्वेश याने व्याजासह १ लाख रुपये त्यानंतर व्याजासहीत दीड लाख अशी वारंवार मागणी केली.
फिर्यादी सुजन सागवेकर यांनी पैसे दिलेले नाहीत म्हणून सर्वेश पाटील याने सागवेकर यांच्या वडिलांच्या नावे २ लाखांची नोटरी करून फिर्यादी सागवेकर यांची फसवणूक केली. वारंवार ज्यादा पैशाची मागणीचा तगादा लावून पैसे दिले नाहीतर तुला व तुझ्या वडिलांना मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी सुजन सागवेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.