मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याची मुदत संपुष्टात आली तरी ५० टक्केच काम झाले आहे. आणखी ६ महिने मुदतवाढ मिळावी यासाठी वरिष्ठ कार्यालयाला प्रस्ताव पाठवला आहे; परंतु डी. व्ही. पी. इन्फ्रा प्रोजेक्टस् प्रा. लि. या ठेकेदार कंपनीकडून अतिशय धिम्या गतीने बंधाऱ्याचे काम सुरू आहे. वारंवार नोटीस देऊनही त्यामध्ये काही बदल होत नाही, हे खेदजनक आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी बंधाऱ्याचे काम पूर्ण करा; अन्यथा पावसाळ्यात येणाऱ्या चक्रीवादळामुळे होणाऱ्या जीवित व वित्तहानीस सर्वस्वी आपण जबाबदार असाल, अशी खरमरीत नोटीस पत्तन विभागाने इन्फ्रा प्रोजेक्टस् ठेकेदार कंपनीला दिली आहे.
एवढेच नाही तर कंपनीच्या या ढिसाळ कारभाराबाबत पुन्हा एकदा १८ लाख ८० हजारांचा दंड प्रस्तावित केला आहे. शहराला लागून असलेल्या मुरूगवाड्यापासून पांढरा समुद्र ते मिऱ्या (मोरे टेंब) पर्यंतचा साडेतीन किमी लांबीचा व ३ मीटर रूंदीचा धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्याचे काम सुरू आहे. येथे ५ मीटर उंचीची व १३०० मीटरपर्यंत टेट्रापॉड टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम पूर्णत्वास आल्यानंतर रोजगारनिर्मिती व पर्यटन विकासासाठी येथे सुशोभीकरण केले जाणार आहे. मिऱ्या किनाऱ्याची पावसाळ्यात उधाणात प्रचंड धूप होते. समुद्राचे अतिक्रमण स्थानिकांच्या सातबाऱ्यावर आले आहे.
गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये नारळाच्या बागा, घरांच्या संरक्षण भिंतीही समुद्राने गिळंकृत केल्या ओहत. तरीही आज बंधारा बांधण्याचे काम धिम्या गतीनेच सुरू आहे. धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या १६९ कोटींच्या कामाचे २६ डिसेंबर २०२१ मध्ये राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन झाले; पण त्या बंधाऱ्याचे केवळ ५० टक्केच काम पूर्ण झाले आहे. २ वर्षांत हे काम पूर्ण करण्याची मुदत शासनाने दिली आहे; परंतु, २ वर्षे पूर्ण झाली तरी फक्त ५० टक्केच धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम झाले आहे.
ठेकेदार कंपनीकडून अटीशर्थीला बगल दिली जात असल्याने आणि कामाच्या गतीमध्ये ढिसाळपणा होत असल्याने पत्तन विभागाने ठेकेदाराला १ फेब्रुवारीला नोटीस बजावली आहे. गेल्या पावसाळ्यात देखभाल दुरुस्ती व निधीच्या अडचणीमुळे ४ महिने हे काम बंद राहिले होते. ते काम सुरू करण्याचे पत्र पत्तन विभागामार्फत देण्यात आले होते. त्यामुळे बंद पडलेले धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम सुरू झाले असले तरी त्याला अपेक्षित गती नाही म्हणून पुन्हा नोटीस बजावली आहे.