आपापल्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगलीच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी नोटिसा बजावल्या आहेत. जिल्ह्यातील ६८ पैकी ५१ प्राथमिक आरोग्यकेंद्रांमध्ये एप्रिल ते ऑगस्ट २०२५ पर्यंत एकही प्रसूती झालेली नाही, एवढी प्राथमिक आरोग्यकेंद्रे अकार्यक्षम असल्याच्या कारणावरून या नोटिसा बजावल्या आहेत. ६८ रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्यकेंद्रे आहेत. सर्वाधिक प्रसूती केवळ दोन झाल्या आहेत. याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनाही नोटीस काढण्यात आली आहे.
सिंधुदुर्गच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई रूपेश धुरी यांनाही नोटीस काढण्यात आली आहे. फोंडा प्राथमिक केंद्रामध्ये असलेली अस्वच्छता, कमी प्रसूती, औषधांची नीट न केलेली मांडणी, अनुपस्थित कर्मचारी याबाबतही त्यांना जबाबदार धरण्यात आले. फोंडा प्राथमिक आरोग्यकेंद्रामधील वॉशबेसिनच्या शेजारी जे पाण्याचे पिंप आहे, त्यातील पाणी दोन ते तीन महिन्यांपूर्वीचे असल्याचेही या नोटिसीमध्ये नमूद करण्यात आले आहे. स्वच्छतागृहाकडे जाताना वीज नसणे, पाण्याच्या टाकीला झाकण नसणे याचाही उल्लेख नोटिसीमध्ये करण्यात आला आहे. एकूणच जिल्ह्याच्या कारभारावर नियंत्रण नसल्याने नागरिकांना चांगली आरोग्यसेवा मिळत नसल्याचा ठपका यामध्ये ठेवण्यात आला आहे.