राजापूर लांजा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजन साळवी यांनी प्रशासनाला रत्नागिरी जिल्हा आत्ता अनलॉक करण्यासाठी आवाहन केले आहे. गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून कमी अधिक प्रमाणामध्ये लॉकडाऊन सुरूच आहे. उद्योगधंदे, व्यवसाय सर्वच ठप्प झाल्याने व्यावसायिकांवर आर्थिक संकट येऊ लागले आहे. त्यामुळे आता रत्नागिरी मधील व्यावसायिक आणि सर्वसामान्य जनतेला इतर जिल्ह्यांप्रमाणे लॉकडाऊनमध्ये शिथिलता देऊन काही निर्बंधासह दुकाने उघडी ठेवण्यास मुभा द्यावी असे आवाहन केले आहे.
तसेच रत्नागिरी जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाने कोरोनाच्या संसर्गाची चेन तोडण्यासाठी ३ जून ते ९ जून पर्यंत कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. कडक लॉकडाऊनची अंमलबजावणीही कडक झाली परंतु, आता लोकांवर संचारबंदीचे निर्णय लादून ठेवण्यात अर्थ नाही. उद्याच्या बुधवारी कडक लॉकडाऊनची मुदत संपत असली तरी, अतिवृष्टीच्या संभाव्य शक्यतेमुळे ११ व १२ जून रोजी जिल्ह्यामध्ये कर्फ्यु जाहीर करण्यात आला आहे. त्या कारणास्तव लांजा राजापूर मतदार संघातील व्यावसायिक आणि रिक्षा व्यावसायिक संघटनांनी यांनी आम.डॉ. राजन साळवी यांना निवेदन देऊन लॉकडाऊन उठवून निर्बंध घालून दुकाने उघडी करण्याची मुभा द्यावी अशी मागणी केली आहे.
गेल्या २ महिन्यांपासून व्यापाऱ्यांचे झालेले आर्थिक नुकसान लक्षात घेता, त्यांच्या मागणीची दखल घेत आम. डॉ. राजन साळवी यांनी जिल्हा प्रशासनाला व्यापाऱ्यांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आवाहन केले आहे. कोरोना विषाणूचे वाढते प्रमाण आणि वारंवार करण्यात येणाऱ्या संचारबंदीमुळे सर्वसामान्य जनता व व्यापारी जगणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याबाबतीत त्वरित निर्णय घेऊन महाराष्ट्र शासनाने आखलेल्या नियमावलीनुसार व्यापाऱ्यांना निर्बंध आणि वेळेची मर्यादा ठरवून देऊन दुकाने उघडी ठेवण्यास सवलत द्यावी असे आवाहन केले आहे.