सातत्यपूर्ण व्हाइटबॉल क्रिकेट खेळल्यानंतर उद्यापासून भारताच्या कसोटी क्रिकेटचे नगारे वाजणार आहेत. डिसेंबरपर्यंत तब्बल १० कसोटी सामन्यांचा कार्यक्रम आहे. यातील पहिला सामना उद्यापासून बांगलादेशविरुद्ध होत आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सध्या अव्वल स्थानावर असलेल्या भारताला अंतिम फेरी निश्चित करण्याची ही सुवर्णसंधी असणार आहे. भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध दोन, न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी सामने मायदेशात खेळल्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबरदरम्यान ऑस्ट्रेलियात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. अर्थात, यादरम्यान भारतीय बांगलादेशविरुद्ध तीन ट्वेन्टी- २० आणि दक्षिण आफ्रिकेत चार द्वेन्टी-२० सामने खेळणार आहेत.
असा आहे इतिहास – २००० सालापासून भारतीय संघाने आतापर्यंत बांगलादेश संघासमोर १३ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात ११ सामन्यांत विजय संपादले आहेत आणि दोन कसोटी सामने अनिर्णीत राहिले आहेत. इतिहास असेच दाखवतो की, मर्यादित षटकांच्या सामन्यात जरातरी लढत देणारा बांगलादेश संघ कसोटी सामन्यात भारतासमोर हात टेकत आला आहे. बांगलादेशने गेल्या भारत दौऱ्यातील दोन कसोटी सामने डावाच्या फरकाने गमावले आहेत. तसे बघायला गेले तर भारत आणि बांगलादेश दोनही संघ नवा गडी नवे राज्य प्रकारात मोडत आहेत. कागदावर तरी बांगलादेशचा संघ समतोल वाटत आहे. गेल्या महिन्यात बांगलादेश संघाने चांगला खेळ करून पाकिस्तानला पराभवाचा चटका दिला आहे.
भारतीय संघ नव्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मैदानात उतरणार आहे. वरकरणी चांगल्या कसोटी – सामन्यासाठी उपयुक्त अशी चेपॉक मैदानाची खेळपट्टी दिसत असल्याने बॅट चेंडूदरम्यान योग्य लढत बघायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नजमुल हुसेन शांतो, लिटन दास आणि मुश्फीकूर रहीम या तिघांवर फलंदाजीची भिस्त आहे, ज्यांना शकीब अल हसन आणि मेहदी हसन मिराज या दोन अष्टपैलू खेळाडूंची जोड असेल. वेगवान गोलंदाजीत हसन मेहमूद आणि ताहीद राणा या दोन नव्या दमाच्या खेळाडूंवर नजर असेल. भारतीय संघाने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासमोर मायदेशात खेळताना शंभरपेक्षा जास्त बळी फिरकी गोलंदाजांसमोर गमावले आहेत, हे विसरून चालणार नाही.
भारतीय संघाच्या याच कमजोरीकडे शकीब अल हसन आणि मेहदी हसन मिगजचे लक्ष असेल. चेन्नईला चांगलीच गरम हवा वाहायला लागली असल्याने चेपॉकची खेळपट्टी काही प्रमाणात वेगवान गोलंदाजांसह पहिले दोन दिवस फलंदाजांना मदत करणार आणि नंतर फिरकीला पोषक वातावरण निर्माण होईल, असा अंदाज आहे. परिणामी, भारतीय संघ तीन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरेल, असे वाटते. स्थानिक हिरो अश्विन आणि जडेजासोबत तिसरी फिरकीची जागा कुलदीप यादवला मिळायची शक्यता आहे.