पालिकेच्या वि. दा. सावरकर नाट्यगृहाचे रूपडे पालटले आाहे. या नव्या ढंगातील नाट्यगृहाचा सोकार्पण सोहळा २६ जानेवारीला होणार आहे. अजूनही अंतर्गत काम युद्धपातळीवर सुरू आहे. सिलिंगसह एसीचे काम अंतिम टप्प्यात आहे. २६ तारखेपर्यंत काम पूर्ण करण्याचा एजन्सीचा आटोकाट प्रयत्न असला तरी बरीच कामे बाकी आहेत. पाच दिवसांत ती पूर्ण करण्याचे मोठे दिव्य निर्माण ग्रुपपुढे आहे. त्यामुळे २६ जानेवारीच्या लोकार्पण सोहळ्याची तारीख हुकण्याची शक्यता आहे. कोकणातील सर्वांत मोठे नाट्यगृह म्हणून वि. दा. सावरकर नाट्यगृहाची ओळख आहे.
या नाट्यगृहाची अवस्था अतिशय वाईट झाली. येथील गैरसोयीमुळे नाट्यकर्मी आणि प्रयोगासाठी येणाऱ्या कलाकारांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. या नाट्यगृहामध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून वातानुकूलित यंत्रणा बसवण्यात आली; परंतु ती कुचकामी ठरली. त्याच्या दुरुस्तीवर खर्च करण्यात आला; मात्र समस्या जैसे थे होती. पालकमंत्री उदय सामंत यांनी याची गंभीर दखल घेत नाट्यगृह दुरुस्तीसाठी पावले उचलली तसेच नाट्यकर्मीनीही या गैरसुविधांबाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन दुरुस्तीची मागणी केली होती.
त्यामुळे नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी ७ कोटी मंजूर झाले आहे. निर्माण ग्रुपने याचा ठेका घेतला आहे. सिलिंगचे काम करू अत्याधुनिक वातानुकूलित यंत्रणेचे काम झाले आहे. सिव्हिल वर्क खराब झाले होते ते पूर्ण झाले. इंटिरिअरचे काम सुरू आहे. नाट्यगृहात आधुनिक आणि नवीन आसने बसवण्यात येणार आहेत.