सव्र्व्हरमधील समस्येमुळे राज्यातील रास्तधान्य दुकानांमधून ई-पॉस मशीनद्वारे होणारे धान्य वाटप थांबवण्यात आले होते. त्यामुळे अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील सर्वसामान्यांची अडचण झाली. जिल्हा पुरवठा विभागाने ऑफलाईन धान्य वितरण करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. शासनाने ही विनंती मान्य केली असून, ऑफलाईन धान्य वितरणास परवानगी दिली आहे; परंतु ही परवानगी केवळ जुलैसाठी असल्याचे शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने कळवल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी सांगितले.
राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरण प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थीची बायोमेट्रिक ओळख पटवून धान्य वितरण करण्यासाठी रास्त धान्य दुकानांमध्ये फोर-जी तंत्रज्ञान असलेल्या ई-पॉस मशीन बसवण्यात आल्या. राज्यात काही दिवसांपासून रास्तभाव दुकानांमधील ई-पॉस मशीनमधून धान्य वितरण करताना तांत्रिक अडचणी येत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. या तांत्रिक समस्येमुळे अन्नधान्य वितरण ऑफलाईन करण्यास मान्यता देण्याची विनंती क्षेत्रीय कार्यालयांनी केली होती.
पण केंद्राने ऑफलाईन धान्य वितरणास परवानगी दिली नव्हती. मात्र सर्व्हरमधील समस्येमुळे रास्तधान्य दुकानांमधून ई-पॉस मशीनद्वारे होणारे धान्य वाटप थांबविण्यात आले होते. यामुळे सर्वसामान्य लाभार्थ्यांची मोठी अडचण निर्माण झाली होती. अखेरीस जिल्हा पुरवठा विभागाने ऑफलाईन धान्य वितरणास केवळ जुलै महिन्यासाठी परवानगी दिली असल्याचे रजपूत यांनी सांगितले.
केवळ जुलैमधील धान्यासाठी – राज्यातील सव्र्व्हरशी संबंधित तांत्रिक अडचणी सुटेपर्यंत एक विशेष बाब म्हणून ऑफलाईन धान्य वितरणास परवानगी देण्यात येत आहे. ऑफलाईन धान्याचे वितरण शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात यावे. ऑफलाईन सुविधा केवळ जुलैमधील अन्नधान्य वितरणासाठी उपलब्ध राहील, असेही शासनाने कळवले आहे.