मुंबई – गोवा महामार्गावरील हातखंबा येथील एका हॉटेलसमोर आणि शहरातील ८० फुटी हायवेवर दोघा मोटारसायकलस्वार भामट्यांनी पोलिस असल्याची बतावणी करून वृद्ध महिलांचे दागिने लुटले. भरदिवसा घडलेल्या या दोन्ही प्रकारांची नोंद शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली. त्यांचा स्वतंत्र पथकाद्वारे तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, फिर्यादी रशिदा रशिद साखरकर (वय ७०, मूळ रा. राजापूर, नाणार इगलवाडी, सध्या रा. पेठकिल्ला, रत्नागिरी) या मंगळवारी (ता. ८) दुपारी पेठकिल्ला येथील घरातून मांडवी दत्तमंदिर येथे त्यांच्या नातीचे औषध आणण्यासाठी गेल्या होत्या. औषधे घेऊन घरी परतत असताना दोन संशयित तरुण त्यांच्यासमोर आले. त्यांनी पोलिस असल्याची बतावणी करत साखरकर यांच्या अंगावरील सोन्याचे व धातूचे दागिने तसेच रोख रक्कम, असा ७० हजार २०० रुपयांचा ऐवज पळवला. यामध्ये १० हजारांची रोख रक्कम, ६० हजारांचे सोन्याचे दागिने व धातूची नकली माळ व बांगड्या होत्या. दरम्यान, फिर्यादी अशिता बळीराम म्हापूस्कर (वय ८०, रा. हातखंबा-नागपूर पेठे, रत्नागिरी) या त्यांच्या नातीसह हातखंबा येथून खेडशी येथील रुग्णालयात दुचाकीने जात होत्या.
हातखंबा तिठा ते खेडशी जाणाऱ्या रस्त्यावर हॉटेलच्या पुढील बाजूस आल्या असता मागून अनोळखी काळ्या रंगाच्या दुचाकीवरील स्वाराने फिर्यादी यांना मी पोलिस आहे, अशी बतावणी केली. त्यांना दुचाकी बाजूस घेण्यास सांगितले. अशिता यांना संशयित स्वाराने पुढे चोऱ्यामाऱ्या सुरू आहेत. तुमच्या गळ्यातील सोन्याची माळ काढून तुमच्या पर्समध्ये ठेवा, असे सांगितले. त्यावेळी दुचाकीच्या मागे बसलेल्या गोऱ्या रंगाचा बारीक डोळे असलेल्या व्यक्तीने आपली धातूची चेन काढून स्वाराकडे दिली. ती कागदाच्या पुडीत बांधली आणि फिर्यादी यांच्या पर्समधील सोन्याची माळ सुमारे ७० हजार किमतीची कागदामध्ये बांधण्यास मागून घेतली. त्याने फिर्यादी यांची सोन्याची माळ आपल्याकडे ठेवून खोटी चेन त्यांच्या पर्समध्ये ठेवून फसवणूक केली. त्यानंतर दुचाकीस्वाराने बारीक डोळ्याच्या व्यक्तीला तुला साहेबांकडे नेतो, असे सांगून दुचाकीवरून निघून गेले. याप्रकरणी रशिदा साखरकर यांनी शहर पोलिस ठाण्यात, तर अशिता म्हापुस्कर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून शहर व ग्रामीण पोलिसांनी दोघा अनोळखींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
स्वतंत्र पथके तैनात – घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी स्वतंत्र पथकाद्वारे भामट्यांचा शोध सुरू केला आहे. अनेक ठिकाणी नाकाबंदीही करण्यात आली. तपासात परिसरातील सीसीटीव्हीचीही मदत घेतली जात आहे.