राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्वरओक घरावर संपकरी एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या जमावाने चप्पल आणि दगडफेक केली. या प्रकरणी पोलिसांनी शोध घेतला असता, कर्मचार्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना ८ एप्रिल रोजी मुंबईतून राहत्या घरातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पण त्याच दरम्यान साताऱ्यामध्ये देखील सदावर्तेंवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने, त्यांना सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या मागील शुक्लकाष्ट काही संपण्याचे चिन्ह दिसत नाही. मराठा समाजाबद्दल द्वेषपूर्ण उद्गार काढल्याप्रकरणी कोल्हापूरमध्ये सदावर्तें विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आता कोल्हापूर पोलिसांकडे गुणरत्न सदावर्तेंचा ताबा देण्यात आला आहे. सातारा न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल्यावर गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा कोल्हापूर पोलिसांना देण्यात आला आहे.
सदावर्तें यांचेवर गुन्हा दाखल होण्याची एका पाठोपाठ मालिकाच सूरु झाली आहे. मुंबई, सातारा, कोल्हापूर, अकोल्यानंतर आता सोलापुरातही त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मराठा आरक्षणाच्या निकाला संदर्भात न्यायालयाच्या निकालाचा अवमान केल्याबद्दल आणि दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणारे आणि चिथावणीखोर वक्तव्य केल्या प्रकरणी सदावर्तेंच्या विरोधात कलम १५३ अ, ब, ५००, ५०६, ५०६, ५०७ कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
छत्रपती घराण्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी सातारा पोलिसांत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता त्यामुळं पोलिसांनी त्यांना अटक केली होती. सातारा सत्र न्यायालयानं ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना जामीन मंजूर केला आहे, यामुळं सदावर्ते यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.