मिरकरवाडा येथे कोट्यवधीचे नवीन मच्छीमार्केट उभारले असतानाही मत्स्यविक्रेते मार्केट सोडून बाहेर क्रॉक्रिटच्या रस्त्यावर बसत आहेत. यामुळे मच्छीमार्केट ओस पडले आहे. मच्छीमारी सोसायट्यांसाठी येणाऱ्या डिझेल टँकरला यामुळे अडथळा होत असल्याच्या तक्रारी मच्छीमार सहकारी संस्थांनी मिरकरवाडा प्राधिकरणाकडे केल्या आहेत. या तक्रारी वाढू लागल्याने प्राधिकरणाकडून कारवाईचे नियोजन सुरू आहे. यापूर्वी मासळी जप्तीची कारवाई झाली. तशी कारवाई होण्याची शक्यता आहे. सकाळने या बेशिस्तीवर ग्राउंड रिपोर्टद्वारे प्रकाश टाकला होता, त्याची दखल आता संस्था आणि प्राधिकरणाने घेतली आहे.
मिरकरवाडा बंदरावरील रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाले आहे. त्याचबरोबर मच्छी विक्रेता महिलांना व्यवसाय करण्यासाठी याठिकाणी मासेमारी विकास अंतर्गत नवीन मच्छीमार्केट बांधण्यात आले आहे. एक कोटी रुपये खर्च करून तब्बल ५० मीटर लांब आणि १९.५० मीटर रुंदीचे हे मच्छीमार्केट आहे. यामध्ये मासळी विक्रेत्यांना बसण्यासाठी सुमारे ७५ ओटे आहेत. परंतु मार्केमध्ये आत बसल्यानंतर अपेक्षित ग्राहक येत नसल्याने पहिल्या रांगेसाठी विक्रत्यांमध्ये वाद होतात. त्यामुळे विक्रेते मार्केट बाहेरच्या नव्याने काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्यावर दुतर्फा बसून विक्री करतात.
येथे ग्राहकांसह त्यांच्या वाहनांची गर्दी असते. याठिकाणी मच्छीमार संस्थांचे डिझेल पंप आहेत. त्यांचे डिझेल टँकर याच रस्त्यावरून येत-जात असल्याने हा मार्ग धोकादायक बनला आहे. प्राधिकरणाने संबंधित महिलांना नवीन मार्केटमध्ये व्यवसाय न केल्यास कारवाई करण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या. राजीवडा महिला मच्छीमार संस्थेसह इतर संस्थानी मिरकरवाडा बंदर प्राधिकरणाकडे लेखी तक्रारी केल्या.