चरस या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दापोली (जि. रत्नागिरी) येथील एकाला ठाणे पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडे सुमारे १ किलो १०६ ग्रॅम चरस व इतर वस्तु, असा एकूण १ कोटी १० लाखांचा मुद्देमाल आढळला असून, तो जप्त केला आहे. मसूद बहुद्दीन ऐनरकर (वय २९, रा. दापोली) असे ठाणे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. या गुन्ह्यात आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट कार्यरत असण्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. कारण चरस हा अमली पदार्थ विदेशातून तस्करी करून भारतात आणला जातो. मसूद ठाण्यात येणार असल्याची गुप्त माहिती ठाणे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचला होता. रत्नागिरी जिल्ह्यातून ठाणे जिल्ह्यात शिळ फाट्याकडून मुंब्रा बाजूकडे मसूद जात होता. तेथील वाहिनीवरील हावरे सिटी या नवीन बांधकामाच्या समोरील सार्वजनिक रोड, शिळ फाटा ठाणे पोलिसांनी झडप टाकून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चरस हा अमली पदार्थ विक्रीसाठी जवळ बाळगल्याचे उघड झाले.
त्याच्याकडून १ किलो १०६ ग्रॅम वजनाचा चरस हा अमली पदार्थ व इतर वस्तू असा एकूण १ कोटी १० लाख ८० हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. मसूद ऐनरकर जिल्ह्यात दापोली तालुक्यातील अपनानगर, खोंडा येथे राहायला आहे. पोलिस हवालदार अमोल देसाई यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, त्यांनी सापळा रचून कारवाई केली. या प्रकाराबाबत मसूद ऐनरकर याच्या विरुद्ध शिळ डायघर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायदा कलम ८ (क), २० (ब) (प) (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी संशयिताला अटक केली आहे. त्याला ठाणे सत्र न्यायालयाने हजर केले असता २३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ कर्णवर-पाटील, ठाणे येथील अमली पदार्थविरोधी पथक, गुन्हे शाखा करत आहे. संशयिताने चरस हा अमली पदार्थ कोणाकडून आणला, याबाबत तपास चालू आहे. चरस हा अमली पदार्थ विदेशातून भारत देशात तस्करी करून आणण्यात आला असण्याची शक्यता आहे. गुन्ह्यात आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता असून त्या अनुषंगाने पुढील तपास करण्यात येत आहे.

