महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने मोठा निर्णय आज आम्ही घेतला. जिल्ह्यातील ९ ते १४ वर्षांच्या १ लाख मुलींना कर्करोगापासून संरक्षण व्हावे, यासाठी एचपीव्ही (ह्युमन् पॅपिलोमा व्हायरस) लस देण्यात येणार आहे. जिल्हा नियोजनमधून त्यासाठी ६ कोटींची तरतूद केली आहे. पहिल्या टप्प्यात ५० हजार मुलींना लस दिली जाणार आहे, असा निर्णय घेणारा रत्नागिरी जिल्हा राज्यातील पहिला आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. जिल्हा विकास योजनेचा गतवर्षी १०० टक्के निधी खर्च झाला आहे. २०२५-२६ साठीच्या ४०६ कोटींचा विकास आराखडा आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. हा निधी आर्थिक वर्षांमध्ये खर्च करण्याच्यादृष्टीने खातेप्रमुखांना सूचना दिल्या आहेत. सामंत म्हणाले, जिल्ह्याच्या लोकसंख्येप्रमाणे गेल्या वर्षी ३११ कोटीचा विकास आराखडा तयार करण्यात आला होता. तो १०० टक्के खर्च केला.
पुढील आर्थिक वर्षासाठी ४०६ कोटींचा विकास आराखड्याला आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या बैठकीमध्ये महिलांच्या आरोग्याबाबत महत्वपूर्ण निर्णय आम्ही घेतला. मुलींना कर्करोग होऊ नये यासाठी एचपीव्ही ही लस देण्यात येणार आहे. ही लस सर्व्हयकल कॅन्सरपासून संरक्षण देणारी आहे. ९ ते १४ वयोगटातील मुलींना ही लस दिली जाणार आहे. जिल्ह्यात १ लाख मुलींना लस देण्याचे उद्दिष्ट आहे; शाळांमध्ये ही लस देण्यात येणार आहे तसेच कॅन्सरबाबत निदान व्हावे यासाठी मॅमोग्राफी टेस्ट केली जाणार आहे. जिल्ह्यातील नद्यांमधील गाळ काढण्याचे काम सुरूच आहे. मुख्यमंत्री रोजगार योजनेचे उद्दिष्ट १२० टक्के पूर्ण झाले आहे, असे सामंत म्हणाले.
१०८ जिल्ह्याबाहेर नेता येणार – शासनाची १०८ रुग्णवाहिकेची सेवा तालुक्यापुरती मर्यादित आहे. मंडणगड, दापोली अशा तालुक्यातील अत्यवस्थ रुग्णांना मुंबई, पुणे येथे उपचाराला घेऊन जाण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांची मान्यता घ्यावी लागते. त्यामध्ये बराच वेळ जातो. त्याचा परिणाम रुग्णाच्या उपचारावर होत आहे. त्यामुळे संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सूचना दिल्यानंतर तत्काळ जिल्ह्याबाहेर जाण्याची मान्यता देण्याची सूचना सामंत यांनी केली आहे.