मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चुकीचे फलक आणि काही ठिकाणी फलकच लावण्यात न आल्यामुळे अनेक गाड्या सलग संगमेश्वर बाजारपेठेमधूनच येत आहेत. त्यामुळे बाजारपेठेमध्ये वाहनांच्या रांगाच रांगा लागत आहेत. त्यामुळे संगमेश्वर येथील व्यापाऱ्यांसह ग्राहकांना नाहक त्रास होत आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. संगमेश्वरमधून जाणाऱ्या महामार्गाचे काम सुरू आहे. मापारी मोहल्ला येथील रामपेठ मार्गे येणाऱ्या मार्गावरून महामार्गावरील वाहने आतमध्ये शिरत असल्यामुळे बाजारपेठेमध्ये वाहनांच्या रांगा आहेत. संगमेश्वर बसस्थानकासमोर चुकीच्या पद्धतीने खड्डा खणून काम सुरू असल्यामुळे सोनवी पुलादरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. महामार्गावर रांगा लागत असल्याने अनेक वाहनचालक संगमेश्वर बाजारपेठेमधून जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे बाजारपेठेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.
वाहतूक कोंडीमुळे व्यापारी तसेच ग्राहकांना बाजारपेठेमधून चालणेही शक्य होत नाही. संगमेश्वर बसस्थानकासमोरील महामार्ग लवकरच सुरळीत करून वाहतूक कोंडी थांबवावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळपासूनच संगमेश्वर बाजारपेठेसह आसुर्डे परिसरातील वीजपुरवठा महावितरणने अचानकपणे खंडित केला. खंडित केलेला वीजपुरवठा पुन्हा कधी सुरू होणार याबाबत महावितरणकडून ग्राहकांना उत्तर दिले जात नाहीत त्यामुळे संगमेश्वरवासीय संतप्त झाले आहेत. महावितरणने अचानकपणे सकाळपासूनच महामार्गाच्या कामासाठी विद्युतपुरवठा खंडित केल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.
सुट्यांमुळे वाहनांची गर्दी – १ मेपासून शाळांना सुट्या सुरू झाल्या आहेत. परिणामी, सुटीचा आनंद घेण्यासाठी मुंबईकर चाकरमानी बुधवारपासून एसटी बस तसेच खासगी वाहनांनी तळकोकणाकडे निघाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी चौपदरीकरणाचे काम रखडलेले आहे. होळी असो वा गणेशोत्सव तसेच शनिवार असो या रविवार या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे मे महिन्यात तर उष्णतेचा पारा वाढत असून, उष्म्यामुळे मुंबईवरून कोकणात खासगी वाहने घेऊन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची मोठी दमछाक होत आहे. संगमेश्वर परिसरातही त्याचा प्रत्यय यंदा वारंवार येत आहे.