तालुक्यातील तुंबाड येथे जगबुडी नदीत पोहायला गेलेल्या पाच तरुणांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला. यातील तिघांना वाचविण्यात यश आले. सौरभ हरिश्चंद्र नाचरे (वय १९, पन्हाळजे), अंकेश संतोष भागणे (२०, बहिरवली, मधली वाडी) अशी दोन मृतांची नावे आहेत. घटना स्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सौरभ, अंकेश, यांच्यासह अभय पांडुरंग भागणे, महेश मारुती गमरे, मयंक प्रकाश बाणाईत असे पाचजण तुंबाड इथल्या नदीवर पोहायला गेले होते. या दरम्यान पाचही जणांनी नदीत पोहण्याच्या निमित्ताने नदीमध्ये उड्या मारल्या.
नेमके भरतीच्या दरम्यानची वेळ असल्याने या पाचही जणांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे पाचही जण गटांगळ्या खाऊ लागले. या दरम्यान तेथे एका मासेमारी करणाऱ्या नावाड्याने तिघांना वाचवले; परंतु सौरभ आणि अंकेश हे भरतीच्या मोठ्या पाण्याच्या प्रवाहात सापडल्याने ते बोटीपर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे ते मृत्युमुखी पडले. स्थानिक ग्रामस्थांनी नंतर त्या दोघांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले. या घटनेची माहिती समजताच खेड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृत सौरभ वायरमन म्हणून काम करत होता, तर अंकेश भागणे मुंबई येथे बेकरीमध्ये कामाला होता.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत खेळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे या दोघांची अधिक माहिती मिळू शकली नाही. या दुर्दैवी घटनेमुळे पन्हाळजे बहिरवली पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे. पोहताना काळजी घ्या उन्हाळी सुटीमुळे परगाववरून अनेकजण सुटीची मजा लुटण्यासाठी आलेली आहेत; परंतु आपण नवख्या ठिकाणी आल्यानंतर नदीच्या प्रवाह, नदीची खोली या संदर्भात माहिती नसल्यास पोहताना काळजी घ्या, असे आवाहन खेड पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांनी केले आहे.