जिल्ह्यामध्ये वारंवार घडणाऱ्या ऑनलाईन फसवणुकीच्या गोष्टीमुळे पोलीस यंत्रणा खूपच सतर्क झाली आहे. आणि लवकरात लवकर तपास करून गुन्हेगारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलीस यंत्रणा करत आहे. अनेक जण या ऑनलाईन फसवणुकीच्या जाळ्यात अडकत असल्याचे समोर आले आहे.
खेड तालुक्यातील लोटे येथील एका महिलेची स्टेट बँक ऑफ इंडियाचा अधिकारी बोलतोय, अशी बतावणी करत बँक खात्यातील ९७ हजार रुपयांची लूट करण्यात आली आहे. महिलेच्या पतीने खेड पोलिस स्थानकात केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात सायबर चोराच्या विरोधात सायबर गुन्हा दाखल केला आहे.
लोटे येथील कांचन रामचंद्र चाळके त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीचा फोन करून, आपण स्टेट बँक ऑफ इंडियामधून बोलत असल्याचे सांगून एटीएम कार्ड अपडेट करण्यासाठी मोबाईलवर आलेला ओटीपी विचारला. कांचन चाळके यांनी सुद्धा संबंधित अनोळखी इसमांवर विश्वास ठेवून, आलेला ओटीपी सांगितला असता, त्यांच्या बँक खात्यातून ९७ हजार २०० रुपये काढून घेण्यात आले.
बँक खात्यामधून एवढी मोठी रक्कम काढण्यात आल्याचा मेसेज कांचन चाळके यांच्या मोबाईलवर आल्यावर, आपण एक प्रकारे ऑनलाईन फसवणुकीचे शिकार बनलो असल्याची कल्पना कांचन चाळके यांना आली. त्यांनी त्वरित पती रामचंद चाळके यांना कळविले असता, यांनी याबाबत ताबडतोब खेड पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात सायबर गुन्हा दाखल केला.
गेल्या काही महिन्यांपासून अशा प्रकारे वृद्ध, महिला, लहान मुले यांना लुबाडण्याचा प्रकार सातत्याने घडत आहेत. एखाद्या अनोळखी व्यक्तीचा फोन आला आणि त्याने बँकेच्या संबंधित काही चौकशी करायला सुरवात केली तर, त्या व्यक्तीला बँक खात्याबद्दल कोणतीही माहिती देऊ नये असे आवाहन वारंवार पोलिसांकडून तसेच बँकेकडून सुद्धा करण्यात येत असते. मात्र तरीही या महत्वाच्या गोष्टींकडे करण्यात येणाऱ्या दुर्लक्षामुळे, अनेकजण या ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकाराला बळी पडत आहेत.