27.1 C
Ratnagiri
Thursday, October 10, 2024

राजापुरात तीन गावांमध्ये वीज पडून नुकसान

ढगांच्या गडगडाटासह रत्नागिरी, राजापूर तालुक्यात परतीच्या पावसाने...

कोकणातील १५ जागा महायुती जिंकेल – मंत्री उदय सामंत

आगामी विधानसभेसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातल्या किती...

सात औद्योगिक संस्थांना नवी ओळख…

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे...
HomeSportsपहिल्या दिवशी ३५ षटकांचाच खेळ, बांगलादेशच्या ३ बाद १०७ धावा

पहिल्या दिवशी ३५ षटकांचाच खेळ, बांगलादेशच्या ३ बाद १०७ धावा

पहिल्या कसोटीतील पहिल्या डावातही त्याने सुरुवातीलाच असेच दोन फलंदाज बाद केले होते.

भारत- बांगलादेश यांच्यात सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी अंदाज व्यक्त करण्यात आल्यानुसार पावसाचा मोठा व्यत्यय आला. त्यामुळे केवळ ३५ षटकांचा खेळ झाला. त्यात बांगलादेशने तीन बाद १०७ अशी मजल मारली. ढगाळ आणि पावसाळी वातावरण यामुळे भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली, परंतु ३५ षटकांच्या खेळात बांगलादेशचे केवळ तीनच फलंदाज बाद करता आले. त्यातील एक विकेट अश्विनने मिळवली. भारताचे हुकमी वेगवान अस्त्र जसप्रीत बुमराने नऊ षटके गोलंदाजी केली, परंतु त्याला एकही विकेट मिळाली नाही. मोहम्मद सिराजही आपल्या खात्यात विकेट जमा करण्यास अपयशी ठरला.

याचा अर्थ भारताचे हे प्रमुख वेगवान गोलंदाज पोषक परिस्थितीचा फायदा घेऊ शकले नाहीत असे नाही. बांगलादेशी फलंदाजांना त्यांनी वारंवार चकवले होते. त्यांचे झेलही उडाले होते, परंतु चेंडू स्लीपच्या डोक्यावरून किंवा दोघांच्या मधून सीमापार गेले. या कसोटीसाठी आकाश दीपला विश्रांती देऊन घरच्या मैदानावर सामना असल्यामुळे फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला संधी दिली जाईल, अशी अपेक्षा होती, परंतु पावसाळी वातावरण लक्षात घेऊन आकाश दीपचे स्थान कायम ठेवले आणि त्यानेच बांगलादेशच्या दोन्ही सलामीवीरांना बाद केले. पहिल्या कसोटीतील पहिल्या डावातही त्याने सुरुवातीलाच असेच दोन फलंदाज बाद केले होते.

काळ्या मातीची खेळपट्टी असल्यामुळे बाऊंस (चेंडूची उसळी) कमी आहे. बुमराने टाकलेला सामन्यातील पहिलाच चेंडू जवळपास सरपटी गेला होता. बुमराच्या हाती असलेला नवा चेंडू सुरुवातीला चांगलाच स्वींग होत होता, परंतु फलंदाजांच्या बॅटला न लागता तो यष्टीरक्षक रिषभ पंतच्या हाती स्थिरावत होता. बुमराची पहिली तीन षटके तर निर्धाव होती. दुसऱ्या बाजूने सिराज गोलंदाजीस आल्यावरही जवळपास असेच चित्र होते, मात्र या वेळी बॅटच्या कडेला लागलेला चेंडू एकतर स्लीपच्या डोक्यावरून किंवा दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून जात होता. बांगलादेशचा सलामीवीर झाकीर हसन २४ चेंडूत खातेही उघडू शकला नाही आणि आकाश दीपच्या चेंडूवर त्याचा झेल गलीमध्ये उभ्या असलेल्या यशस्वी जयस्वालने अप्रतिमपणे झेलला.

आकाश दीपने काही वेळातच बांगलादेशला दुसरा धक्का दिला. दुसरा सलामीवीर शादमन इस्लामला त्याने पायचीत केले. वास्तविक मैदानावरील पंचांनी त्याला नाबाद ठरवले होते, परंतु तिसऱ्या पंचांकडे दाद मागिल्यावर तो बाद असल्याचे स्पष्ट झाले. मोईनुल हक आणि कर्णधार शांतो यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी केली. उपाहाराला खेळ थांबताच पाऊस आला. त्यामुळे निर्धारित ब्रेकपेक्षा १५ मिनिटे उशिराने खेळ सुरू झाला आणि अश्विनने शांतोला पायचीत केले. या वेळी त्याने डीआरएस घेतला, परंतु चेंडू यष्टींवर लागत असल्याचे दिसून आले.

मोईनूल हकने नाबाद ४० धावा केल्या असल्या तरी तो अधूनमधून चाचपडत होता. दुसरा नाबाद फलंदाज मुशफिकर रहिमही अडखळत राहिला, परंतु भारतीय गोलंदाज त्यांना बाद करण्या अगोदर अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबला आणि लगेचच जोरदार पाऊस सुरू झाला, परिणामी खेळ तेथेच थांबवण्यात आला.

बांगलादेश, पहिला डाव : झाकीर हसन झे. जयस्वाल गो. आकाश दीप ०, शादमन इस्लाम पायचीत गो आकाश दीप २४, मोईनुल हक खेळत आहे ४०, नजमुल हुसैन शांतो पायचीत गो. अश्विन ३१, मुशफिकर रहिम खेळत आहे ६, अवांतर ६, एकूण ३५ षटकांत ३ बाद १०७.

बाद क्रम : १-२६, २-२९, ३-८०. गोलंदाजी : जसप्रीत बुमरा ९-४-१९- ०, मोहम्मद सिराज ७-०-२७-०, आर. अश्विन ९-०-२२-१, आकाश दीप १०-४-३४-२.

RELATED ARTICLES

Most Popular