जूनचे २१ दिवस संपले, तरी मॉन्सूनचा पत्ता नाही. खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. १९७२ मधील दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राची महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणाच्या पाणीसाठ्याने तळ गाठला. प्रकल्पातून अवघी ३६ मेगावॉट वीजनिर्मिती केली जात आहे. पाचव्यांदा धरणात अत्यंत कमी साठा राहिल्याची ही पाचवी वेळ आहे. धरणात उपयुक्त पाणीसाठा फक्त ६.७८ टीएमसी आहे. पावसाने लवकर हजेरी न लावल्यास येत्या दोन दिवसांत धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच १० टीएमसीपेक्षा कमी पाणीसाठा पाहायला मिळेल, अशी परिस्थिती आहे. कोयना धरणाची पाणीसाठा साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. धरणाचा मृत पाणीसाठा पाच टीएमसी व उपयुक्त पाणीसाठा १००.२५ टीएमसी आहे. गतवर्षी मुसळधार पावसामुळे जलाशयात एकूण १५९.७६ टीएमसी पाण्याची आवक झाली होती. त्यापैकी पश्चिमेला वीजनिर्मितीसाठी ८२.६४ टीएमसी पाणी वापर झाला आहे.
६८.५० टीएमसी वीजनिर्मितीसाठी पाणीवापर बंधनकारक आहे; मात्र, अतिवृष्टी काळात पाणीसाठा रिव्हर स्लुईस गेटमधून १.१८ टीएमसी पाणी सोडले आहे. कोयना धरणाच्या इतिहासात २० टीएमसीपेक्षा कमी पाणीसाठा आजपर्यंत पाचवेळा पाहायला मिळाला आहे. २२ जून २०१७ ला १६.३० टीएमसी, १ जुलै २०२२ ला १३.५५ टीएमसी, ११ जुलै २०१४ ला १२.५५ टीएमसी, २९ जून २०१६ ला १२.१८ टीएमसी आणि २७ जून २०१९ ला सर्वात कमी १०.१३ टीएमसी धरणात पाणीसाठा पाहायला मिळाला आहे. जलाशयात आज एकूण ११.०३ टीएमसी पाणीसाठा असून, दोन दिवस पावसाचे आगमन न झाल्यास धरणाच्या इंतिहासात प्रथमच १० ‘टीएमसीपेक्षा कमी पाणीसाठा माहावा लागणार आहे. वीजनिर्मितीचा चौथा टप्पा बंद पडला आहे. उपयुक्त ६.७८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, शिल्लक पाणीसाठा जपून वापरावा लागणार आहे. मॉन्सून येत्या काही दिवसांत न आल्यास राज्यासमोर वीजनिर्मितीबरोबर पाणीटंचाईचे संकट उभे राहण्याची भीती आहे.