27.2 C
Ratnagiri
Wednesday, October 4, 2023

जिल्ह्यात पावसाने २४ लाखांची हानी

सलग दोन दिवस वेगवान वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार...

रत्नागिरी मोर्चाने दणाणली, जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचा आक्रोश

जुनी पेन्शन लागू करा, शाळांचे खासगीकरण थांबवा,...
HomeRatnagiriएमआयडीसीचीही पाच दिवसांनी पाणीकपात - पाणी टंचाई

एमआयडीसीचीही पाच दिवसांनी पाणीकपात – पाणी टंचाई

तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींसह मिरजोळे आणि झाडगाव ‘एमआयडीसी’मधील उद्योगांना हरचिरी धरणातून पाणीपुरवठा सुरळीत होता. अजून पाच दिवस पावसाला विलंब झाला तर पाणीकपात करण्याची वेळ ‘एमआयडीसी’वर येणार आहे. सध्या दहा एमएलडी पाणी दिवसाला एक हजार ८०० ग्राहकांना दिले जात असल्याचे ‘एमआयडीसी’कडून सांगण्यात आले. मिरजोळे, कुवारबाव, शिरगावसह आजुबाजूच्या नऊ ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थांना हरचिरी धरणातील पाणी पुरवले जाते. मिरजोळे आणि झाडगाव या दोन एमआयडीसींमधील सुमारे दीड हजाराहून अधिक उद्योगांना पाणी देण्यासाठी या धरणातून पाईपलाईन उभारण्यात आली आहे. हरचिरी धरणात पुरेसा पाणीसाठा व्हावा यासाठी काजळी नदीवर साखळी धरणे उभारण्यात आली आहेत. टप्प्याटप्प्याने साठा करून त्या धरणातील पाणी आजुबाजूच्या गावांना पुरवले जाते.

मोसमी पाऊस लांबल्यामुळे उन्हाच्या कडाक्याचा फटका हरचिरी धरणातील पाणीसाठ्याला बसलेला आहे. तरीही एमआयडीसीकडून नियोजन करण्यात आल्यामुळे पाणी व्यवस्थित ग्राहकांना पुरवले जात आहे; परंतु पावसाचे आगमन लांबत असल्यामुळे धरणातील साठ्यावरही परिणाम होत आहे. प्रत्येक दिवशी ग्राहकांना पाणी मिळत असले तरीही पुढील दहा दिवस पुरेल एवढाच साठा उपलब्ध आहे. त्यामुळे एमआयडीसीतील ग्राहकांवर पाणीकपातीचे संकट आ वासून उभे आहे. मिरजोळे एमआयडीसीमधील अनेक उद्योग सुरू आहेत. त्यांना एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ एमआयडीसीवर येऊ शकते. हवामान विभागाकडून २३ जूनला पाऊस पडेल, असे सांगण्यात आले आहे. पाऊस सुरू झाला नाही; तर मात्र पाणीकपात करण्याचा पर्याय एमआयडीसीला अवलंबावा लागणार आहे. याला अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular