रत्नागिरीमध्ये गेल्या ३ दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले असतानाच आता या पावसाचा मोठा फटका महत्त्वाच्या रस्ते वाहतुकीलाही बसला आहे. मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील उद्यमनगर ते परटवणे दरम्यान बिबटीचा पऱ्या या ठिकाणी रस्त्याचा मोठा भाग खचला आहे. सुदैवाने मोठा अपघात टळला असून वाहतुकीसाठी हा मार्ग तातडीने बंद करण्यात आला आहे. बिबटीचा पऱ्या येथे खचलेल्या रस्त्याचा भाग खोल असून, सुमारे १५-२० फुट अंतराचा भाग ढासळला आहे. रस्त्याच्या तळाशी पाणी साचल्यामुळे. मातीचा भराव वाहून गेला आणि त्यामुळे हा प्रकार घडल्याचे प्राथमिक अंदाज वर्तवले जात आहेत. सुदैवाने घटनेच्या वेळी कोणतेही वाहन या ठिकाणी नसल्याने जीवितहानी टळली.
वाहतूक बंद – सध्या या मार्गावरून जाणारी सर्व वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. अनेक प्रवासी आणि मालवाहतूक वाहने अडकून पडली असून प्रशासनाकडून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक पोलीस आणि महाम ार्ग प्राधिकरणाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून सुरक्षेच्या दृष्टीने मार्ग बंद ठेवण्यात येत आहे.
नागरिकांचा संताप – मिऱ्या-रत्नागिरी-नागपूर महाम ार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू असून, हे काम अपूर्ण स्थितीतच सोडल्याने आणि योग्य पावसाळी – व्यवस्थापन केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. कामाच्या गुणवत्तेबाबत शंका व्यक्त केली जात असून, संबंधित ठेकेदार आणि विभागावर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी जोर धरत आहे.
जिल्हा प्रशासन अलर्ट – रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने तातडीची बैठक बोलावून या घटनेचा आढावा घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मार्गाचा दररोज हजारो नागरिक वापर करत असतात. अशावेळी अपुऱ्या नियोजनामुळे आणि निकृष्ट कामामुळे रस्ता खचल्याने लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अशा घटनांमुळे आगामी दिवसांत अजून किती समस्या उद्भवतील? याची चिंता नागरिक व्यक्त करत आहेत.