सध्या वाहतूक सुरू असलेल्या रस्त्याची चाळण झाली असून, अर्धा फूट खोल खड्ड्यांमधून वाहने चालवावी लागत आहेत. साळवीस्टॉप हा चौक झाला असून, या ठिकाणी सध्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे वाहनांसाठी एक बाजू मार्ग वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूच्या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या चौकात रत्नागिरी शहरातून हातखंब्याकडे तर हातखंब्याकडून रत्नागिरी शहराकडे वाहतूक सुरू असते. त्यात परटवणेकडून येणारी वाहने जोडली जातात. तसेच नाचणे रोडकडून येणारी वाहनेही याच ठिकाणी मुख्य रस्त्यावर येत असतात. त्यामुळे रत्नागिरी शहरातील साळवीस्टॉप परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. सध्या पर्यटक मोठ्या प्रमाणात आल्यामुळे त्यात अधिक भर पडलेली आहे. बुधवारी (ता. २१) मॉन्सूनपूर्व मुसळधार पावसाने वाहनचालकांची सत्वपरीक्षाच पाहिली होती.
चौपदरीकरणामुळे काही ठिकाणी मातीचे ढिगारे ठेवले आहेत. सध्या वाहने जात असलेल्या रस्त्याची पावसामुळे दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहनचालकांना चिखलातून मार्गक्रमण करावे लागत आहे. साळवी स्टॉप ते जे. के. फाईल्स या अवघ्या २०० मीटरच्या अंतरावर जाण्यासाठी सुमारे एक तास लागत आहे. यामध्ये मोकाट गुरे फिरत असल्याने वाहतुकीत आणखीन अडथळा येतो. या ठिकाणी बुधवारी सायंकाळी काँक्रीट केलेल्या रस्त्यावरून वाहतूक वळवण्यात आली; मात्र तो रस्ताही खराब असल्याने तिथेही कोंडी होत होती. या सर्व गोंधळामुळे वाहनचालकांची आणखीनच गैरसोय झाली. दिवसा या ठिकाणी पोलिस होते; परंतु प्रत्येकाला पुढे जाण्याची घाई असल्याने त्यांचाही नाईलाज होत होता. सायंकाळी साळवी स्टॉप येथे एसटी बसेस, खासगी बसेस प्रवाशांसाठी थांबतात. आणखीन अडथळा येतो. .
या ठिकाणी बुधवारी सायंकाळी काँक्रीट केलेल्या रस्त्यावरून वाहतूक वळवण्यात आली; मात्र तो रस्ताही खराब असल्याने तिथेही कोंडी होत होती. या सर्व गोंधळामुळे वाहनचालकांची आणखीनच गैरसोय झाली. दिवसा या ठिकाणी पोलिस होते; परंतु प्रत्येकाला पुढे जाण्याची घाई असल्याने त्यांचाही नाईलाज होत होता. सायंकाळी साळवी स्टॉप येथे एसटी बसेस, खासगी बसेस प्रवाशांसाठी थांबतात. त्यामुळे वाहनांना अडथळा होतो. पावसामुळे वाहनचालकांची अधिक गैरसोय होत असून, सायंकाळच्या सुमारास कोंडी टाळण्यासाठी पोलिसांचे संख्याबळ वाढवणे आवश्यक आहे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
जे. के. फाईल्स रोडवर अडथळा – जे. के. फाईल्स थांब्यापासून एमआयडीसीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर सीएनजी भरण्यासाठी वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा पाहायला मिळत आहेत. या मार्गावरील अर्धा रस्ता या वाहनांनीच अडवून ठेवलेला आहे. त्यामुळे तिथेही वाहतूक कोंडी होते. हा रस्ता मुख्य रस्त्याला जोडलेला असल्याने त्याचा फटका मुख्य रस्त्यावरून एमआयडीसीकडे जाणाऱ्या वाहनांना बसतो. तिथेही वाहतूक कोंडी होते.
हे आहेत पर्यायी मार्ग – मुख्य रस्त्यावरील कोंडी कमी करण्यासाठी रत्नागिरीतून कोकणनगर मार्गे विमानतळावरून एमआयडीसी, रेल्वेस्टेशनकडे जाता येते. तसेच रत्नागिरीतून नाचणे मार्गे कुवारबावला जाणे शक्य आहे, जेणेकरून साळवीस्टॉपवरील होणारी कोंडी कमी करणे शक्य आहे.