वीजग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याच्या उद्देशाने महावितरणकडून घरोघरी प्रीपेड किंवा पोस्टपेड स्मार्ट मीटर बसवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. स्मार्ट वीजमीटरला मोबाईलप्रमाणे रिचार्ज करता येणार आहे. मात्र, त्या मीटरला ग्राहकांकडून विरोध होत आहे. त्यामुळे ही योजना बारगळण्याची शक्यता आहे. केंद्र शासनाने डिजिटल इंडियाच्या माध्यमातून सर्व व्यवहार ऑनलाईन केले आहेत. त्यात महावितरणही मागे नाही. महावितरणने नवीन स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात काही जिल्ह्यात प्रायोगिकतत्वावर त्याचा वापर सुरू झाला असून भविष्यात घरोघरी स्मार्ट मिटर बसविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. स्मार्ट मीटरमध्ये किती वीज वापरली याची माहिती ग्राहकाला मोबाइलवर मिळू शकते. वीज वापरासाठीचे पैसेही कुठूनही, कधीही भरता येणार आहेत. त्यामुळे ग्राहकाला वीजवापर कमी-जास्त करता येईल. मोबाइलच्या धर्तीवरच ग्राहकांना विजेसाठी रिचार्ज करता येणार आहे. प्रीपेड स्मार्ट मीटरमध्ये ग्राहकाने भरलेले पैसे संपले की वीजपुरवठा खंडीत होणार आहे.
अत्याधुनिक स्मार्ट मीटर उपयुक्त आणि फायदेशीर असल्याचे महावितरणचे मत आहे. या प्रीपेड स्मार्ट मीटरला वीज ग्राहकांकडून विरोध होत आहे. काम सुरू असताना अचानक पैसे संपले आणि विज पुरवठा बंद झाला तर संबंधिताला मोठा फटका बसू शकतो. त्याचबरोबर ग्रामीण भागात अजुनही मोबाईलवरून पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध नाही. जसे फायदे आहेत, तसे अनेक तोटे असल्यामुळे घरोघरी स्मार्ट मीटर बसविण्यासाठी विरोध होत आहे. त्यामुळे याची अंमलबजावणी करणे महावितरणपुढे आव्हान आहे.