माजी खासदार विनायक राऊत यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेली नोटीस म्हणजे रडीचा डाव आहे. २०१९ मध्ये आमचा झालेला पराभव आम्ही स्वीकारला. आम्ही त्यानंतर रडारड करीत बसलो नाही. त्यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेली नोटीस म्हणजे कोकणी जनतेचा अपमान आहे. राऊत यांनी कोकणी जनतेची माफी मागायला हवी, असे मत माजी खासदार नीलेश राणे यांनी व्यक्त केले. रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या माजी खासदार नीलेश राणे यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी ते म्हणाले की, पैशाने जर तुमचा पराभव झाला असे वाटत असेल तर तुम्ही दहा वर्षात काय काम केले हे जनतेसमोर ठेवायला हवे होते.
तुमच्याच गावात तुम्ही ‘मायनस’ (कमी मताधिक्य) का झालात याचेही उत्तर तुम्ही जनतेला द्यायला हवे. विनायक राऊत यांच्यात पराभव स्वीकारण्याचे धाडस नसल्यानेच ते आता आरोप करीत सुटले आहेत. त्यांचे प्रयत्न आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आहेत. म्हणूनच त्यांनी नारायण राणे यांची खासदारपदी झालेली निवड रद्द करावी, अशी मागणी केली आहे. निवडणूक आयोगाला पाठवलेली नोटीस म्हणजे कोकणी जनतेचा अपमान आहे. कोकणातील जनतेने खासदार राणे यांना तब्बल ५० हजार मतांनी निवडून दिले असल्याचे माजी खासदार नीलेश राणे यांनी सांगितले.