जिल्ह्यात वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाचा मारा सुरू झालेला आहे; मात्र जिल्ह्यात कोठेही नुकसान झालेले नाही. जगबुडी, शास्त्री, अर्जुना, कोदवली, काजळी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. हवामान विभागानेही पुढील तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. वेगवान वाऱ्यामुळे समुद्र खवळलेला असून, मोठ्या लाटा फुटत आहेत. जिल्ह्यात आज सकाळी ८.३० 1 वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत सरासरी ५१.५९ मिलिमीटर पाऊस झाला. त्यात मंडणगड ४६.५०, खेड ५१.४२, दापोली ५४, चिपळूण ५०, गुहागर ७६, संगमेश्वर ३६, रत्नागिरी ४९.३३, लांजा ४३.६०, राजापूर ५७.५० मिमी नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १,७१२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत सरासरी ७०० मिमी कमी पाऊस झाला आहे.
बंगालच्या उपसागरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे उपसागराच्या भागात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. तसेच अरबी समुद्रावरही जोरदार वारे सक्रिय झाले असून, कोकण किनारपट्टीसह वादळीवाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पुढील चार दिवस कोकणात ठिकठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे, असे हवामान विभागाकडून स्पष्ट केले आहे. मागील आठवड्यापासून पावसासाठी पोषक स्थिती तयार झाली असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात गेले चार दिवस सरींचा पाऊस सुरू आहे. आज सकाळपासूनच वेगवान वाऱ्यासह पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदीकिनारी भागांना अलर्ट दिला आहे. समुद्रही खवळलेला असल्याने कोणीही मासेमारीला जाऊ नये, अशा सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत.
प्रशासन सज्ज – जिल्ह्यात वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाचा मारा सुरू झाला आहे. जिल्ह्यात कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास तातडीने मदत पोहोचवण्यास जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.