रविवारनंतर सोमवारी पुन्हा एकदा देवणे पुलाच्याखाली आणि परिसरात गोवंशसदृश्य प्राण्याचे अवयव आणि काही मांस आढळल्याने खेड शहरात संतापाची लाट उसळली आहे. यामुळे काही संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला असतानाच पोलीसांनी परिस्थिती कौशल्याने हाताळत ४ संशयित आरोपींना पकडले आहे. खेड शहरात पूर्णतः शांतता असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस निरिक्षक नितिन भोयर यांनी केले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रविवारपासूनच खेडमध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलीसांची अतिरिक्त कुमक मागविण्यात आली होती.
पुलाखाली अवयव – खेड शहर ते खाडीपट्टा मार्गावर असलेल्या नवीन देवणे पुलाखाली रविवारी सायंकाळी ५ ते ६ गोवंशसदृश्य प्राण्याचे अवयव आढळल्याने संताप व्यक्त होत होता. रविवारी मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी नागरिकही एकवटले होते. हे कृत्य करणाऱ्या समाजकंटकाला तातडीने अटक करा अशी मागणी लोकांकडून करण्यात येत होती. त्यासाठी जनता रस्त्यावर उतरली होती. रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
ना. कदमांचे आदेश – दरम्यान रविवारी गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम हेदेखील खेडच्या दौऱ्यावर होते. त्यांनीदेखील परिस्थितीचा आढावा घेतला. एकवटलेल्या नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत २४ तासांच्या आत आरोपींवर कडक कारवाई करा असे आदेश पोलीसांना दिले होते. त्यानंतर जमाव शांतपणे पांगला.
पुन्हा अवयव दिसले – सोमवारी सकाळी पुन्हा एकदा त्याठिकाणी गोवंशसदृश्य काही अवयव आणि मांस सापडल्याचे वृत्त कळताच खेड शहरात संतापाची लाट उसळली. यामुळे पुन्हा एकदा लोकं रस्त्यावर आली. उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. पोलीसांनी परिस्थिती संयमाने हाताळली. आंदोलन करण्याची गरज नाही, तपास सुरू आहे, लवकरच आरोपींना पकडण्यातः यश मिळेल असे सांगत पोलीसांनी जमावाचा राग शांत केला.
४ संशयितांना पकडले – दरम्यान जनतेमध्ये संतापाची लाट उसळली असतानाच पोलीसांनी परिस्थिती कौशल्याने हाताळत वेगाने तपासदेखील केला आहे. सोमवारी सायंकाळी याप्रकरणी ४ संशयित आरोपींना पकडले असून पुढीले कार्यवाही सुरू होती. दरम्यान ४. संशयितांना पकडल्याने जनतेचा रागही आता ओसरला आहे. मात्र सखोल तपास करून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
खेडमध्ये शांतता – खेडमध्ये आता शांतता असून कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरिक्षक नितिन भोयर यांनी केले आहे.