एसटी कर्मचाऱ्यांनी काल शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलन केलं. अचानक झालेल्या या आंदोलनामुळं एकच खळबळ उडाली. शरद पवार यांच्या सिल्वर ओक बंगल्यावर काल अचानक संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचा जमाव गोळा झाला आणि पवारांच्या घरावर दगड आणि चप्पलफेक केल्याने सर्व स्तरातून निषेध केला जात आहे.
शरद पवारांच्या घरावर झालेल्या या आंदोलनावर सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया येत आहेत. खासदार संजय राऊत यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांच्या झालेला अशा प्रकारचा घरावरील हल्ला आम्ही कदापि सहन करणार नाही. गुणरत्न सदावर्ते हा भाजपचा नेता असून तो कुठं राहतो, कोणाच्या घरात राहतो, त्याला आर्थिक पाठबळ कोणाचं आहे याचा आम्ही शोध घेणार आहोत.
फक्त शरद पवारांच्या विरोधातच बोलण्यासाठी सदावर्तेला तयार केलं गेलं आहे. कोणता राजकीय पक्ष त्यांना पोसतो, हे सर्वज्ञात आहे. शिवसेनेनं नेहमीच कामगारांची पाठराखण केली आहे पण कालचा प्रकार दुर्दैवी आणि निंदनीय असल्याच त्यांनी म्हटलं आहे. पुढे ते म्हणाले, सध्या ठाकरे आणि पवारांच्या विरोधात गरळ ओकण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्या प्रकारे कालच्या हल्ला प्रकरणात भाजप नेत्यांच्या मी प्रतिक्रिया पाहिल्या, त्यानुसार कालपर्यंत राष्ट्रवादीत आणि आज भाजपत गेलेले नेतेच या हल्ल्याचं समर्थन करत आहेत. त्यामुळं एसटी कर्मचाऱ्याचं कालचं आंदोलन नव्हतं, तर तो एक प्रकारचा हल्ला होता, अशा शब्दांत त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांवर टीका केली आहे.
आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या घरी पोहचले असून, पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे. मुंबई पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. एसटी संपकरी कर्मचार्यांचे वकील गुणरत्न सदावर्तेंच्या घरी चार-पाच पोलीस दाखल झाले असून, कोणतीही पूर्व सूचना न देता आपल्याला चौकशीसाठी नेत असल्याचे सदावर्ते यांनी म्हटले आहे. तसेच, चौकशीसाठी पोलिसांना आपण पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे एसटी आंदोलक कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.
दरम्यान, घरा बाहेर पडताना आपली हत्या होऊ शकते असे म्हणत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे. तर गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात जी कलमं दाखल झाली आहेत त्यामध्ये नोटीस देण्याची गरज नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.