जिल्ह्यात सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना व भाजप युतीच्या माध्यमातून निवडून आलेले खासदार विनायक राऊत हे एकदाही फिरकले देखील नसून, त्यांनी कोणताही विकासनिधी आवश्यकतेनुसार उपलब्ध न केल्यामुळे पावस परिसरामध्ये नाराजीचा सूर निघत आहे.
दोनही गटांमध्ये चांगलीच चुरस दिसून आली. प्रचारा दरम्यान सामंत यांच्या पाठीराख्यांछे वर्चस्व अधिक होते. गावामध्ये सर्वांगीण विकास करायचा असेल तर निधीची आवश्यकता असते. त्या गोष्टी आमदार व उद्योगमंत्री यांच्या माध्यमातून प्रत्येकाला मिळू शकतात. त्यादृष्टीने प्रचारयंत्रणा बाळासाहेबांची शिवसेना विभागप्रमुख विजय चव्हाण यांनी राबवली. तसेच जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी जिल्हा परिषद गटामध्ये बैठकांचे आयोजन करून गाव विकासमय होण्यासाठी उद्योगमंत्री कशाप्रकारे काम करत आहेत व त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याचे काय योगदान आहे, याची जाणीव प्रत्येक कार्यकर्त्याला करून देण्यात आली व सक्रिय राहण्याचे आदेश देण्यात आले.
निकालाचा दिवस उजाडला तरी देखील उद्धव सेनेचे कोणीच पदाधिकारी फिरकले नसल्याने, या नाराजीचा किती फटका शिवसेना उद्धव गटाला बसणार याचा पडताळा दि. २० ला निकालाच्या दिवशी कळणार आहे. पूर्णगड, मावळंगे आणि गावडेआंबेरे या ग्रामपंचायतीमध्ये बाळासाहेबांची शिवसेना व भाजप युतीच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत. यातील पूर्णगड ग्रामपंचायतीमध्ये ठाकरे गट व शिंदे गट यांच्या एकेक जागा बिनविरोध आल्याने सात जागा व सरपंच अशी निवडणूक झाली. गावडेआंबेरे ग्रामपंचायतीमध्ये गाव पॅनलच्या माध्यमातून सहा जागा बिनविरोध झाल्यामुळे उर्वरित तीन जागांकरिता तिन्ही पक्षाचे निवडणूक उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला.
तर मावळंगे ग्रामपंचायतीमध्ये शिंदे गट व भाजप यांची युती झाल्याने निवडणुकीमध्ये चांगलाच रंग भरला आहे. या ग्रामपंचायतीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांची शिवसेना या पार्टीचे जिल्हाध्यक्ष राहुल पंडित यांनी बैठकींचा सपाटा सुरू ठेवला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे कारण, जिल्हाध्यक्ष पदाचा कारभार हाती घेतल्यापासून मावळंगे गावासाठी गेली पाच वर्ष ग्रामपंचायतीमध्ये सत्ता असूनही एक रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला नाही.