रत्नागिरीतील कोरोना संक्रमितांची संख्या वाढण्यामध्ये जोर चढला असून, दवाखानेही अपुरे पडू लागले आहेत. त्यामध्येच होम आयसोलेशन पर्याय बंद केल्याने आणि रुग्णांची वाढती संख्या पाहता संस्थात्मक आयसोलेशन केंद्र स्थापण्यावर जास्तीत जास्त भर दिला जात आहे. गावामध्ये एक तरी आयसोलेशन अथवा कोविड सेंटरची निर्मिती झाली तर मोठ्या संख्येने वाढणाऱ्या रुग्ण संख्येमध्ये नक्कीच घट होईल.
पावस येथील गोळपसडा येथे २० बेडचे कोविड सेंटर मजलिस ए फलाहे दारेन या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी म्हणून उभारण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा ३० मे रोजी सकाळी १०.३० वाजता नाम. उदय सामंत यांच्या हस्ते करण्याचे योजिले आहे. या कोविड सेंटर मध्ये ना नफा ना तोटा तत्वावर रुग्णांना सेवा दिली जाणार आहे. पूर्वी या जागी अरबी मदरसा होता, तो बंद करून त्याजागी या समाजउपयोगी कोविड केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. रुग्ण आणि नातेवाईकांसाठी केअर सेन्टरमध्ये कॅंटीनची व्यवस्थाही करण्यात आली आहे. शासनाच्या नियमावली नुसार कोरोनाची सौम्य साधारण लक्षणे असणार्या रुग्णांना विलगीकरणासाठी म्हणून या कोविड सेंटरमध्ये दाखल करण्याची सुविधा केली गेली आहे. सरकारने आखून दिलेल्या नियमावली नुसारच कमी दर आकारून योग्य ती उपचार पद्धती अवलंबणार असल्याचे कोविड केअर सेन्टरच्या कोअर कमिटीचे पदाधिकारी रफिक बिजापुरी यांनी म्हटले आहे.
३० मे ला असणार्या उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्यासाठी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ मोहित कुमार गर्ग यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच संस्थेचे रमुख आणि सदस्य उपस्थित राहणार आहेत. तसेच या कोविड सेंटरचा लाभ आसपासच्या गावातील गरजू लोकांनी अवश्य घ्यावा असे आवाहन मजलिस ए फलाहे दारेन या संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.