सर्पदंश झालेला रुग्ण आयसीयूमध्ये दाखल झाला तर त्याला महात्मा फुले जनआरोग्य अभियानांतर्गत साहाय्य मिळावे, अशी मागणी आमदार भास्कर जाधव यांनी विधिमंडळ अधिवेशनात केली. यावर विधानसभा अध्यक्षांनी गांभीर्याने दखल घेऊन तत्काळ निर्णय करण्याचे निर्देश शासनाला दिले. त्यामुळे कोकणातीलच नव्हे तर राज्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. डेरवण येथे घडलेल्या प्रकारामुळे हा मुद्दा समोर आला आहे. चिपळूण तालुक्यातील बोरगाव येथील संतोष हळदणकर काही कारणास्तव डेरवण रुग्णालयात २६ जुलैला एका रुग्णाला पाहण्यासाठी गेले होते.
तत्पूर्वी कौंढरताम्हाणे येथील सर्पदंश झालेल्या मोहिनी जाधव या रुग्णालयात उपचार घेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी चौकशी केली असता ही महिला आयसीयूमध्ये असल्याचे समजले. या वेळी हळदणकर यांनी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनेमध्ये या उपचाराचा खर्च समाविष्ट होईल का असे विचारले. यावर वैद्यकीय अधिकारी म्हणाले, जर व्हेंटिलेटरवर रुग्ण असेल तरच या योजनेचा लाभ मिळतो. यावेळी हळदणकर यांनी आमदार जाधव यांना संपर्क साधून हा मुद्दा त्यांच्या कानावर घातला व हा मुद्दा अधिवेशनामध्ये मांडण्याचा आग्रह केला.
जाधव यांनी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला व विधानसभा अध्यक्षांच्या हे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे आता सर्पदंश झालेला रुग्ण जर आयसीयूमध्ये असेल तर त्याला उपचाराचा खर्च मिळण्यास मदत होणार आहे. अत्यंत महत्वाचा मुद्दा जाधव यांनी मांडून शासनाला त्याची दखल घेण्यास भाग पाडले. त्यामुळे याचा फायदा राज्यातील अनेक शेतकऱ्यांना मिळणार आहे. कोकणात भात लावण्या आणि भात कापण्यांवेळी सर्पदंशाचे प्रकार घडतात. अशावेळी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळू शकेल.