रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात नवजात शिशू, बालमृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्याकरिता रोटरी क्लबने पुढाकार घेत बालकांच्या अतिदक्षता विभागात अद्ययावत साधने, उपकरणे दिली आहेत. सुमारे ३२ लाख रुपये खर्चून अतिदक्षता विभाग अद्ययावत केला आहे. या विभागाचा लोकार्पण सोहळा १२ सप्टेंबरला आयोजित केल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. जिल्हा शासकीय रुग्णालयात सायंकाळी पत्रकार परिषद झाली. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, रोटरी क्लबचे अध्यक्ष श्रीकांत भुर्के, राजेंद्र घाग, देवदत्त मुकादम, सचिन सारोळकर, विनायक हातखंबकर आदी उपस्थित होते.
रुग्णालयाची मागणी लक्षात घेऊन रोटरी क्लबने ग्लोबल ग्रँड प्रोजेक्ट याअंतर्गत आंतरराष्ट्रीय पातळीवर रोटरी क्लबकडे मागणी केली. क्लब व डिस्ट्रीक्ट गव्हर्नर, रत्नागिरी क्लब व अनेक देणगीदार यांच्यामुळे निधी गोळा करता आला आणि ३२ लाख रुपयांची साधनसामग्री खरेदी करण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. फुले म्हणाल्या, साधारण दर महिन्याला नवजात बालकांच्या कक्षात ८० ते १०० मुले दाखल होतात.
मुदतपूर्व जन्मल्यामुळे बालकांचे वजन कमी असते. त्यामुळे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करावे लागतात. रोटरीक्लबच्या योगदानामुळे रुग्णालयात अद्ययावत उपकरणे आली आहेत. यामुळे मृत्यूदर शून्यावर रोटरी आणण्यात यश मिळेल. माजी अध्यक्ष राजू घाग म्हणाले की, गेल्या दीड वर्षांपासून या प्रकल्प नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभागातील उपकरणांसाठी प्रयत्न सुरू होते. नवजात बालकांच्या उपचासाठी आता रत्नागिरीबाहेर जावे लागणार नाही.