पेन्शन मिळण्यास होणारा विलंब यावर ठोस निर्णय, २०१९ पासून गटविमा प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यांना न्याय मिळवून देणे, पदोन्नती वेतन (पूर्वलक्षित) वाढ मिळण्यासाठी जिल्हा व राज्य संघटनेने सामुदायिक प्रयत्न करण्याबाबत महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेने महत्त्वाचे निर्णय घेतले. संघटनेच्या रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची सभा चिपळूण येथे जिल्हाध्यक्ष प्रभाकर खानविलकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सातवा वेतन आयोग ४-५ हप्ता पूर्तता, १ जुलै काल्पनिक वेतनवाढ पूर्तता व उर्वरित नियोजन, वैद्यकीय बिल, महागाई व निवड श्रेणी फरक या प्रकारची रक्कमांची देयके त्वरित मिळण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत चर्चा करण्यात आली आणि सभासदांना माहिती देण्यात आली.
यशवंत पाडावे कार्याध्यक्ष, राजाराम सावंत, प्रकाश सावर्डेकर, सुनील चव्हाण, उपाध्यक्ष माणिक कांबळे, सचिव कुळकर्णी, दादा महाडिक, सुचित्रा सुर्वे, प्रकाश शिंदे, वरक, आर. के. चव्हाण, नागनाथ माळी, गौतम पाटील उपस्थित होते. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या व प्रश्नांबाबत सभागृहाला माहिती देऊन संघटना या समस्या सोडवण्यासाठी कोणत्या प्रकारे प्रयत्न करत आहेत याबाबत माहिती देण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. समस्या निश्चित स्वरूपात सोडवण्यासाठी संघटना प्रयत्न करत आहे; परंतु तरीही विलंब होत असल्याबाबत जि. प. प्रशासनाशी चर्चा करण्यात आली असून, या संदर्भात मार्ग काढण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष खानविलकर यानी सांगितले.