31.4 C
Ratnagiri
Saturday, February 22, 2025

दिरंगाई केल्यास काम काढून घेणार- मंत्री शिवेंद्रराजे भोसले

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मे अखेरपर्यंत पूर्णत्वास...

गावडेआंबेरे विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

रत्नागिरी तालुक्यातील गावडेआंबेरे येथील पाटीलवाडीत पहाटेच्या सुमारास...

आजपासून आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाला प्रारंभ

दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी...
HomeChiplunचिपळुणात महामार्गावरील पूल कोसळल्याने जनता संतप्त

चिपळुणात महामार्गावरील पूल कोसळल्याने जनता संतप्त

बहादुरशेख नाका येथे राष्ट्रवादीच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी रास्तारोको केला.

मुंबई-गोवा महामार्गाच्या दूरावस्थेने सामान्य जनता त्रस्त झालेली असतानाच महामार्गावरील पूल कोसळल्याने संताप व्यक्त होत आहे. या संतापाला मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वाट मोकळी करुन दिली. बहादुरशेख नाका येथे राष्ट्रवादीच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी रास्तारोको केला. कार्यकर्त्यांची आक्रमकता आणि रोखण्यात आलेला महामार्ग याचा विचार करून आ. निकम यांनी मध्यस्थी करीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना शांत केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. प्रशासन आणि ठेकेदार यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बहादूरशेखनाका येथील नव्याने उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचा गर्डर सोमवारी खचल्यानंतर दुपारी पुलच कोसळला.

पुलाच्या पाहणीसाठी गेलेलें आमदार शेखर निकम व त्यांचे सहकारी थोडक्यात वाचले. मात्र काहींना धावपळीत दुखापत झाली. एकूणच महामार्गाच्या निकृष्ट कामावरून मंगळवारी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी संताप व्यक्त केला. सकाळी १०.३० वा.च्या सुमारास कार्यकर्ते आमदार निकमांच्या कार्यालयासमोर जमले. तेथे ठेकेदार कंपनी, राष्ट्रीय महामार्ग विभागाविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. ठेकेदार कंपनीच्या निकृष्ट कामाचा आणि बेपर्वाईचा निषेध केला. तेथून संतापलेल्या राष्ट्रवादीच्या जमावाने कामथे येथील ठेकेदार कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. तेथे कोणीही जबाबदार अधिकारी नव्हते. तेथील काहींना पदाधिकाऱ्यांनी चांगले फटके दिल्याची चर्चा सुरु आहे. कंपनीच्या मोडतोडीच्या पार्श्वभुमीवर डीवायएसपी, पोलिस निरीक्षक व पोलिसांचा ताफा तैनात होता. त्यामुळे अनुचीत प्रकार घडला नाही.

महामार्ग कार्यालयावर धडक – कामथे येथून जमावाने राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालायवर धडक दिली. तेथेही संबंधीत जबाबदार अधिकारी नव्हते. चर्चे. साठी अधिकारी येत नसल्याने कार्यकत्यांनी घोषणाबाजी केली. राष्ट्रीय महामार्ग तसेच ठेकेदार कंपनी व कन्सलटन्सीचे अधिकारी चर्चेस टाळाटाळ करीत असल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जमाव राष्ट्रीय महामार्ग कार्यालयातून बहादूरशेखनाका येथे पोहोचला. सुमारे सव्वा बाराच्या सुमारास बहादूरशेखनाका येथील सिटी सेंटर समोरील कोपऱ्यावर महामार्गावरच ठिय्या मांडून रास्ता रोकोला सुरुवात झाली. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे यांच्या नेतृत्वाखाली हा रास्ता रोको करण्यात आला. पोलिसांनी विनंती केली तरी कार्यकर्ते रस्त्यावरून उठण्यास तयार नव्हते. ठेकेदार कंपनी तसेच महामार्गच्या अधिकाऱ्यांनी येथेच चर्चेसाठी बोलवण्याची मागणी करण्यात आली.

आ. निकमांची सूचना – शेवटी आमदार शेखर निकम यांनी रास्ता रोको स्थगित करण्याची सूचना कार्यकर्त्याना केली. तसेच प्रांताधिकारी आकाश लिगाडे व डीवायएसपी राजेंद्रकुमार राजमाने यांनी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यामुळे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. सुमारे पाऊणतास झालेल्या रास्ता रोकोमुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, युवक तालुकाध्यक्ष निलेश कदम, रमेश राणे, माजी सरपंच दशरथ दाभोळकर, सरचिटणीस दिशा दाभोळकर, राकेश दाभोळकर, रियाज खेरटकर, मुंढे सरपंच मयुर खेतले, उदय ओतारी, किशोर रेडीज, जागृती शिंदे, बरकत पाते यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES

Most Popular