रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला जोडणाऱ्या सागवे – कात्रादेवी नजिकच्या आंबेरी याठिकाणी असलेल्या विजयदुर्ग पोलिस स्थानकाच्या हद्दीतील चेकपोस्टवर वाहनांतील महिला वृध्दांसह सर्व प्रवाशांना मध्यरात्री खाली उतरवून चालकासह मोबाईलवर फोटो काढण्याचे प्रकार सुरू असल्याने प्रवासी वर्गाकडून संताप व्यक्त केला जात आहे. वाहनचालकाचे ड्रंक अँड ड्राईव्ह आहे का ? वाहनाचे पासिंग कोणते आहे? वाहनाची वैध कागदपत्रे आहेत का? वाहनामध्ये कोणतेही आक्षेपार्ह सामान आहे का? वाहनातील प्रवाशांची नावे पत्ता कोणता? अशी चौकशी सुरक्षिततेच्या दृष्टीने गरजेचीच आहे.
यावर कोणी आक्षेप घेण्याची गरजही नाही. मात्र केवळ वाहन राजापूर तालुक्यातील आहे म्हणून वाहनातील महिला, वृध्दांसह अपरात्री सर्व प्रवाशांना बाहेर उतरवून फोटो काढण्याची सिंधुदूर्ग पोलिसांची पध्दत अनेकांना खटकली आहे. वरिष्ठांना आम्ही चेकींग केले हे दाखवण्यासाठी फोटो काढत असल्याचे सांगणेही गंभीर बाब असल्याच्या प्रतिक्रीया उमटत आहेत. बुधवारी २५ ऑक्टोबर रोजी रात्री १० च्या सुमारास राजापूर शहरातून देवगड येथे गेलेल्या काही नागरिकांना याचा अनुभव आला.
रात्री परतत असताना दहाच्या सुमारास तेथे काही पोलिस होते. त्यांनी परतणारे खासगी वाहन हेरून चालकासह वाहनातील सर्वांनी खाली उतरावे आम्हाला वरिष्ठांना चेकींग करीत आहोत हे दाखवण्यासाठी फोटो घ्यायचा आहे असे सांगीतले. त्या वाहनामध्ये रत्नागिरी जिल्हा न्यायालयाचे सेवानिवृत्त रजिस्ट्रार तसेच काही महिला, पत्रकारही होते. वाहनाची व इतर कागदपत्रांची तपासणी करा, अपरात्री फोटोची पध्दत कोणती? आम्ही लगतच्या राजापुरातीलच आहोत असे सांगताच आम्हाला वरिष्ठांना दाखवण्यासाठी फोटोच हवा आहे असे त्यातील एक पोलिस वारंवार सांगत होता.