भाजपाने जिल्ह्यात पुन्हा २८ ऑक्टो. एकदा आक्रमक सुरुवात केली असून, नव्या पदाधिकार्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. नव्या पदाधिकार्यांनी जोमाने काम सुरु केले असले तरी काम करणार्यांना पदे मिळत नसल्याने. काही पदाधिकारी नाराज झाले आहेत. भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी व माजी नगराध्यक्षांची नाराजी वाढली असून लवकरच ते कमळाची साथ सोडणार असल्याची चर्चा आता भाजप वर्तुळात दबक्या आवाजात सुरु झाली आहे. भारतीय जनता पार्टीने पक्षांतर्गत बदल करून नवीन नियुक्त्या महिना- दीड महिन्यापूर्वी केल्या. जिल्हा, तालुका व शहर कार्यकारिण्या नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. शहर अध्यक्षपदी ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र फाळके यांची निवड झाल्यानंतर रत्नागिरी शहर कार्यकारिणीत अनेक नवे चेहरे दिसून येत आहेत.
माजी नगरसेवकांना या कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. परंतु शहराध्यक्षपदी फाळकेंची निवड काहींना रुचलेली दिसत नाही. एका माजी नगरसेवकाला शहराध्यक्षपद मिळावे म्हणून प्रयत्न सुरु होते. परंतु भाजपाच्या वरिष्ठांशी चर्चा करुन हे पद फाळके यांना देण्यात आले. शहराध्यक्ष फाळके यांच्या निवडीनंतर काहीं पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीची री ओढली गेली आहे. भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी व माजी नगराध्यक्षही या बदलांमुळे नाराज झाले आहेत. भाजपाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांजवळ त्यांनी ही नाराजी व्यक्त केली नसली तरी आता तरी सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये चर्चेत येऊ लागली आहे. माजी नगराध्यक्ष म्हणून काम करताना या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम केले आहे.
त्यामुळे सर्वच पक्षियांशी त्यांचे सलोख्याचे व जवळचे संबंध आहेत. कुणाच्याही भावना न दुखावल्यामुळे त्यांना मानणारा एक वर्ग शहरामध्ये आहे. मागील दीड-दोन वर्षात स्वपक्षीयांनीही त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यासारखीच स्थिती आहे. अनेक कार्यक्रमात विश्वासात न घेतल्यामुळे या माजी नगराध्यक्षांची नाराजी वाढली असून ते लवकरच अन्य पक्षामध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चाही बाजारपेठेत सुरु झाली आहे. मागील काही महिन्यांपूर्वी. पालकमंत्री व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या माजी नगराध्यक्षांच्या कार्यकाळातील कामाची स्तुती केली होती. हे माजी नगराध्यक्ष ‘कमळ’ सोडून ‘धनुष्य’ हातात घेण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा होऊ लागली आहे. त्यामुळे दीपावलीला हा मुहुर्तु साधला जाणार की नंतर याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.