गेल्या दोन दिवसांपूर्वी चिपळूण शहरातील काही भागात पूरसदृश स्थिती निर्माण झाल्याचे पाहावयास मिळाले. सोमवारी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पूर ओसरला आणि चिपळूण पालिकेने स्वच्छतामोहीम राबवली. या वेळी गटारांमध्ये प्लास्टिक बाटल्यांचा खच आढळून आला. प्लास्टिक बाटल्या गटारे, नदीमध्ये टाकू नका, असे आवाहन करूनही चिपळूणमधील काही नागरिकांनी झोपेचे सोंग घेतल्याचे दिसून येत आहे. याबाबत जागरूक नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
मुसळधार पावसामुळे चिपळूण शहरातील चिंचनाका, वडनाका, रंगोबा साबळेरोड, भाजीमंडई परिसर, अनंत आईस फॅक्टरी, शंकरवाडी मुरादपूर रोड आदी परिसरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. सोमवारी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पूर ओसरला; मात्र काही भागात रस्त्यांवर चिखल आणि गटारे तुंबल्याचे पाहावयास मिळाले. यामुळे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालयीन अधीक्षक अनंत मोरे, आरोग्य निरीक्षक महेश जाधव, आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते, सर्व मुकादम व सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली.
पूरग्रस्त रस्त्यांवरील सफाई कर्मचाऱ्यांनी चिखल बाजूला केला तर गटारे मोकळी करत असताना या गटारांमध्ये प्लास्टिक बाटल्यांचा खच आढळून आला. प्लास्टिकच्या बाटल्यामुळे पर्यावरणाला काय फटका बसतो किंवा दुष्परिणाम काय होतात, हे सर्वांनाच माहित आहे तसेच प्लास्टिक बाटल्यांमुळे ड्रेनेज तुंबते हे माहिती असूनही प्लास्टिक बाटल्या गटारांमध्ये टाकल्या जात आहेत. प्लास्टिकचा कचरा मोकळ्या जागेत किंवा गटारे, नदीमध्ये टाकणाऱ्यांवर चिपळूण नगरपालिकेने दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.