कुवारबाव ग्रामपंचायतचा नियोजित घनकचरा निर्मूलन प्रकल्प व्हावा यासाठी तसा प्रस्ताव ग्रामपंचायतीने २५ मार्च २३ रोजी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे पाठविलेला आहे. पाठविलेला हा प्रस्ताव ग्रामपंचायतीने लवकरात लवकर मंजूर करून घेऊन मार्गी लावण्याबाबतचा ठराव कुवारबाव परिसर जेष्ठ नागरिक संघाच्या शनिवार दिनांक २८ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या मासिक स्नेह मेळाव्यात मंजूर करण्यात आला आहे. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाचा एक भाग म्हणून पत्रकार कॉलनीच्या जवळील नाल्यावर चार ते पाच फुट उंचीची भिंत बांधून त्यावर स्वच्छतेचे संदेश रंगवून ग्रामस्थांचे सार्वजनिक स्वच्छतेविषयी प्रबोधन करण्यात यावे.
तसेच मुख्य रस्त्याच्या बाजूला झाडी उगवलेली असून साईड पट्टीचे डांबरीकरण करून घेण्यात यावे, त्यामुळे याठिकाणी रस्त्यावर कचरा कणाऱ्यांना प्रतिबंध करता येईल. याबाबतची मागणी एका निवेदनाद्वारे कुवारबाव परिसर जेष्ठ नागरिक संघ कुवारबाव तर्फे सरपंच कुवारबाव ग्रामपंचायत यांच्याकडे करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीला दिलेल्या या निवेदनासोबत ठरावाची प्रतही जोडण्यात आली आहे. या ठरावात पत्रकार कॉलनी जवळील नाल्यात टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे निर्माण झालेली भयावह परिस्थिती नमूद केलेली असून डास प्रतिबंधक मोहीम तातडीने सुरू करण्याची मागणी केलेली आहे.
ती गांभीर्याने अंमलात आणावी तसेच आजूबाजूच्या अपार्टमेंटमधील टाकल्या जाणाऱ्या रहिवाशांकडून कचऱ्याची गांभीर्याने दखल घेऊन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना तत्काळ नोटीसा देऊन कारवाई व्हावी. अपार्टमेंटमध्ये शोष खड्डा काढून तिथेच कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा नियम आहे, याची जाणीव संबंधितांना करून दिली जावी. ज्येष्ठ नागरिक संघाच्या या ठरावाची तातडीने गांभीर्यपूर्वक अंमलबजावणी करून ग्रामस्थांना सहकार्य करावे, अशी विनंती ही या निवेदनात करण्यात आली आहे.