पालकमंत्र्यांच्या माध्यमातून लांजा नगरपंचायतीला १६ कोटी रुपये मंजूर झाल्याचे जे मोठमोठे बोर्ड लावले होते त्या सोळा कोटींपैकी एक पैसा जरी नगरपंचायतीच्या खात्यात जमा झाला असेल तर मी आमदारकीचा राजीनामा देईन, असे खुले आव्हान लांजा- राजापूरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष मनोहर बाईंत आणि विरोधकांना दिले आहे. लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी मंगळवारी ३१ ऑक्टोबर रोजी शहरातील शिवसेना पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद् घेतली. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष मनोहर बाईत यांना थेट आव्हान दिले.
ते पुढे म्हणाले की, लांजावासियांनी शिवसेनेवर विश्वास टाकून शिवसेनेच्या हाती सत्ता दिली होती. मात्र शिवसेना फुटीनंतर नगराध्यक्ष आणि काही नगरसेवक शिवसेना शिंदे गटात गेले. त्यानंतर पालकमंत्र्यांच्या माध्यमातून लांजा नगरपंचायतीला १६.२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे बॅनर प्रत्येक नगरपंचायत प्रभाग लावण्यात आले होते. मात्र या १६.२५ कोटींपैकी एकही पैसा नगरपंचायतीच्या खात्यावर जमा झालेला नाही. याउलट आपण वेगवेगळ्या माध्यमातून शहरातील विविध विकासकामांसाठी ९ कोटी १५ लाख रुपयांचा निधी आणला. मात्र नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे जमा असलेले पैसे खर्च करू शकत नाहीत ही मोठी शोकांतिका आहे.
उलट १६ कोटी रुपये आल्याचे सांगून श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही जी कामे मंजूर आहेत ती बदलण्याचे पाप नगराध्यक्ष करत आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला नाही तर आगामी निवडणुकीत शहरातील जनताच नगराध्यक्ष आणि त्यांच्या समर्थक नगरसेवकांना घरी बसवेल, असा ठाम विश्वास यावेळी आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला आमदार राजन साळवी यांच्यासह शिवसेना उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, लांजा तालुकाप्रमुख संदीप दळवी, शहरप्रमुख नागेश कुरूप, नगरपंचायत गटनेत्या पूर्वा मुळे, नगरसेवक स्वरूप गुरव, राजेश हळदणकर, लहू कांबळे आदि उपस्थित होते.