उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरी दौऱ्यासाठी चिपळूण आगारातील ३० एसटी बस आरक्षित करण्यात आल्या. यामुळे शुक्रवार व शनिवार अशा दोन दिवस ग्रामीण भागातील शंभरहून अधिक बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थी, कामगार व प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. बारावी परीक्षा सुरू असतानाही एसटी महामंडळाने पर्यायी व्यवस्था न केल्याने विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय झाली. प्रवाशांनाही तासन्तास एसटीची वाट पाहत थांब्यावर आणि बस स्थानकात तिष्ठत उभे राहावे लागले. चिपळूण आगारात एकूण ११४ बस आहेत. त्यापैकी ८४ साध्या बस लोकल मार्गावर धावतात. आधीच एसटी बसची संख्या कमी आहे. त्यातच त्यातील ३० बसेस उपमुख्यमंत्र्यांच्या त्नागिरी दौऱ्यासाठी पाठविण्यात आल्याने चिपळूण आगाराचे वेळापत्रक पुरते कोलमडले होते. त्याचा फटका बारावीची परीक्षा देणारे विद्यार्थी, कामगार तसेच ग्रामीण भागातील प्रवाशांनाही बसला.
अचानक बस फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. त्यामुळे चिपळूण मध्यवर्ती बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. संतापलेल्या प्रवाशांनी चौकशी कक्षातील अधिकाऱ्यांनाही खडे बोल सुनावले. प्रवाशांना घरी पोहोचण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. रत्नागिरी येथील कार्यक्रमामुळे शंभरहून अधिक लोकलच्या बस फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. यामध्ये अनेक रात्रीपाळींच्या बस फेऱ्यांचाही समावेश आहे. या बसबरोबर तीस चालक व तीस वाहक यांनाही पाठविण्यात आले. कमी बस आणि त्यातच जवळपास ६० कर्मचारी बाहेर असल्याने आगार प्रशासनाला बस फेऱ्यांचे नियोजन करताना नाकीनऊ आले.
राऊत-सामंतांचे आरोप-प्रत्यारोप – दरम्यान, माजी खासदार विनायक राऊत यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर रत्नागिरी येथे शक्तिप्रदर्शन करण्यासाठी एसटी बस आरक्षित केल्या. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा विचार न करता शक्तिप्रदर्शन करण्यासाठी एसटीला हाताशी धरून केविलवाणा प्रयत्न केल्याचा आरोप केला. मात्र त्यावर श्री. सामंत यांनी आरक्षित केलेल्या एसटीचे मार्ग तपासणी करून, परीक्षार्थीना त्रास होणार नाही यादृष्टीने नियोजन केले होते. तसे नियोजन एसटीच्या अधिकाऱ्यांना सांगून केले होते, असे प्रत्युत्तर दिले.